News Flash

टायटॅनिकमधील प्रवाशाच्या ‘त्या’ पॉकेट वॉचवर तब्बल ४० लाखांची बोली

३४ वर्षांच्या रशियन प्रवाशाचा या अपघातात मृत्यू झाला. त्याची पत्नी मात्र या अपघातातून बचावली.

कँटोरच्या पत्नीला त्याच्या कोटच्या खिशात लहानसं पॉकेटवॉच सापडलं. (छाया सौजन्य : हेरिटेज ऑक्शन )

इतिहासात टायटॅनिक जहाजाचा उल्लेख ‘कधीही न बुडणारे जहाज’ असा केला होता. मात्र या महाकाय जहाजाला पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळाली. १५ एप्रिल १९१२ रोजी हिमनगावर आदळून उत्तर अटलांटिक महासागरात हे जहाज बुडाले. या घटनेला १०० वर्षांहूनही अधिकचा काळ लोटला. पण आजच्या पिढीमध्येही या जहाजाविषयी कमालीचं कुतूहल आहे.

टायटॅनिकला जलसमाधी मिळाल्यानंतर तिच्यामध्ये मिळालेल्या किंवा तिच्याशी निगडीत अनेक वस्तूंनां संग्रहाकाकडून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. या वस्तूंना नंतर कोट्यवधींची बोलीही लागली. मागील काही वर्षांत टायटॅनिकशी निगडीत अनेक वस्तूंचा लिलाव पार पडला. नुकताच टायटॅनिकशी निगडीत आणखी एका वस्तूचा लिलाव पार पडला. टायटॅनिकसोबत जलसमाधी मिळालेल्या एका रशियन प्रवाशाच्या पॉकेट वॉचवर तब्बल ४० लाखांची बोली लावण्यात आली आहे.

१९१२ मध्ये सिनाई कँटोर या ३४ वर्षांच्या रशियन प्रवाशाचा या अपघातात मृत्यू झाला. त्याची पत्नी मात्र या अपघातातून बचावली. नंतर शोधमोहिमेद्वारे मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यावेळी कँटोरच्या पत्नीला त्याच्या कोटाच्या खिशात लहानसं पॉकेटवॉच सापडलं. नवऱ्याची शेवटची आठवण म्हणून तिनं हे पॉकेटवॉच जपून ठेवलं होतं.

प्राण वाचवणाऱ्या कोटाला सर्वांत मोठी बोली
टायटॅनिकच्या अपघातात एका महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कोटाचाही २०१७ मध्ये सर्वाधिक किंमतीला लिलाव करण्यात आला. टायटॅनिकशी निगडीत अनेक गोष्टींचा संग्रह उपलब्ध आहे या संग्रहांपैकी तो कोट पाहायला येणाऱ्यांची संख्या अधिक होती. या कोटाचा २,३२,००० डॉलर म्हणजे जवळपास दीड कोटींना लिलाव करण्यात आला. विशेष म्हणजे अपेक्षेपेक्षाही अधिक किंमत मोजून ब्रिटनच्या एका संग्राहकाने तो विकत घेतला.

टायटॅनिकमधल्या ‘त्या’ पत्राचा १ कोटींना लिलाव
गेल्याच वर्षी टायटॅनिकमधल्या पत्रांचा १ कोटींना लिलाव करण्यात आला. टायटॅनिकमधून प्रवास करणाऱ्या उच्चभ्रु वर्गातील एका प्रवाशाने हे जहाज बुडण्यापूर्वी एकदिवस आधी आपल्या आईला पत्र लिहिले होते. हे पत्र इतके वर्षे त्यांच्या कुटुंबियांनी जपून ठेवलं होतं. अॅलेक्सझँडर होलवर्सन यांनी आपल्या आईला पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी टायटॅनिकमधल्या जेवणाची आणि संगीताची स्तुती केली होती. टायटॅनिकला अपघात होण्यापूर्वी त्यांनी पत्र लिहिलं होतं, या अपघातात त्यांचा मृत्यू झाला पण त्यांची पत्नी मात्र वाचली.

टायटॅनिकवरील खुर्चीचा लिलाव
२०१५ मध्ये टायटॅनिकवरील डेकचेअरचा १ लाख पौंडांना लिलाव करण्यात आला होता. नानटुकेट लाकडी खुर्ची त्या दुर्घटनेत पाण्यावर तरंगत होती व मॅके बेनेटच्या कर्मचाऱ्यांना ती सापडली होती. जहाजावर पहिल्या वर्गातील लोकांना बसण्यासाठी ती खुर्ची होती, ती सापडल्यानंतर माजी कर्मचारी ज्युलियन लेमार्टलेर यांना देण्यात आली होती. १५ वर्षे ती इंग्लंडमधील टायटॅनिक वस्तू संग्राहक व्यक्तीच्या ताब्यात होती. मॅके-बेनेटच्या कर्मचाऱ्यांना अशा सहा ते सात खुच्र्या तेव्हा सापडल्या होत्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 10:49 am

Web Title: pocket watch from titanic russian passenger sold at auction
Next Stories
1 Social Viral : या फोटोतील साप शोधून तर दाखवा…
2 Kerala floods: सुट्टीवर असूनही ‘तो’ राहिला ‘ऑन ड्युटी’; पूरग्रस्तांना दिला मदतीचा हात
3 पंतप्रधानांचे नाव बदलले तरच भाजपाला मते मिळतील – केजरीवाल
Just Now!
X