करोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र अद्यापही भारतात करोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने सरकार कामा शिवाय घराबाहेर पडू नका असे आवाहन जनतेला करत आहेत. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास देखील सांगितले जात आहे. पण याचे उल्लंघन करणाऱ्यांना मात्र पोलीस चांगलाच धडा शिकवताना दिसत आहेत.

तरी देखील अनेक जण पोलिसांना फसवून घराच्या गच्चीवर किंवा इमारतीच्या गच्चीवर बसताना दिसत आहेत. हे थांबवण्यासाठी पोलिसांनी एक नवा उपाय काढला आहे. घराच्या किंवा इमारतीच्या गच्चीवर काय सुरु आहे हे पाहण्यासाठी पोलीस ड्रोन कॅमेराची मदत घेत आहेत. असाच एक टिक-टॉक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सध्या पोलिस ड्रोनच्या सहाय्याने लोकांनी एका ठिकाणी गर्दी केली आहे की नाही हे तापसत आहेत. अशातच एक टिक-टॉक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सद्दाम अंसारीने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये काही लोक इमारतीच्या गच्चीवर पत्ते खेळत बसलेले असतात. तेवढ्यात पोलिसांचा ड्रोन कॅमेरा तेथे पाहणीसाठी पोहोचतो. ते पाहून तेथे बसलेले लोक उठून पळून जाताना दिसत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

@saddam600

original sound – Aasif pathan

लॉकडाउन लागू होऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात (८.३३ टक्के) पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल पंजाब (७.८९ टक्के)आणि हिमाचल प्रदेश (७.६९ टक्के ) या राज्यांची नोंद असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. गर्दी कमी झाली असली, तरी संसर्ग होण्याचा वेग कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे