रेल्वे रुळावर कचरा वेचणा-यांच्या मुलांचे भविष्य ते काय..? कचरा विकून जे काही पैसे हातात येतात त्यात एकवेळचे पुरेसे जेवणही मिळत नाही. अशावेळी रुळावरचा कचरा वेचून कधी उपाशी झोपायचे तर कधी कोणापुढे हात पसरवायचे. सगळ्यांची ही परिस्थिती. पण गाया स्टेशन परिसरात कचरा वेचणा-या मुलांच्या वाट्याला ही वेळ येऊ नये यासाठी एक रेल्वे पोलीस धडपडत आहे. बिहार पोलिसात कार्यरत असलेले प्रवीण कुमार हे इतरांसाठी पोलीस असले तरी कचरा वेचकांच्या मुलांसाठी मात्र ते उत्तम शिक्षक आहेत. त्यांना जेव्हा आपल्या कामातून वेळ मिळतो तेव्हा या मुलांना एकत्र करून शिक्षण देण्याचे काम ते करतात.  या स्टेशन परिसरातील  कचरा वेचणारी १५- २० मुलं त्यांच्याकडे शिक्षण घ्यायला येतात. कधी कधी वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील या मुलांना शिक्षण देण्यासाठी येतात.

प्रवीण कुमार यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे त्यांचे खूपच कौतुक होत आहे. त्यांच्यामुळे अनेक मुलांचे भविष्य घडणार आहे. त्यांच्याकडे शिक्षण घेणा-या एका मुलीने शिकून पोलीस दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर या मुलांची शाळा भरते. प्रवीण कुमार या मुलांवर खूप मेहनत घेतात. या मुलांचे भविष्य उज्वल होवो एवढा हेतू ठेवून ते या मुलांना शिकवतात.