पोलीस नागरिकांचं रक्षण करतात पण दिल्ली पोलीस दलातील काही पोलिसांनी आपली सारी तत्त्वे पायदळी तुडवत एका नागरिकाला जबर मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतो आहे. दिल्लीतल्या रोहिणी इथली रहिवाशी असलेल्या मेघा गुप्ता नावाच्या महिलेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या नवऱ्याला काही चूक नसताना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मेघा हिचे पती अमित गुप्ता १८ मेला रात्री अकरा वाजता पंजाबी बाग इथून घरी परतत असताना त्यांची गाडी आणि पोलिसांच्या मोटारसायकलमध्ये धडक झाली.

मेघाच्या फेसबुक पोस्टनुसार, अमित आपल्या गाडीने घरी परतत होते. तेव्हा पोलिसांची मोटारसायकल उलट दिशेने आली आणि यातच धडक होऊन अपघात झाला. अमितने पोलिसांना मदतीसाठी हात दिला. पण पोलिसांनी अमितला मारहाण करायला सुरूवात केली. अमितने दिलेल्या माहितीनुसार या पोलिसांना मद्यप्राशन केलं होतं आणि ते उलट दिशेने गाडी चालवत होते. पण स्वत:ची मोठी चूक असताना देखील पोलिसांनी अमितला तुरुंगात डांबलं तसेच त्याला पट्ट्याने मारहाणही केली. एवढंच नाहीतर अमितला त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यासही पोलिसांनी मज्जाव केला. पोलिसांच्या मारहाणीत अमित जबर जखमी झाला आहे.

इतकेच नाही तर पोलिसांनी अमितच्या सुटकेसाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोपही त्याच्या पत्नीने केला आहे. शेवटी गुप्ता कुटुंबीयांनी ६० हजार रुपये देऊन अमितची पोलिसांच्या कोठडीतून सुटका करून घेतली, असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. मेघाने घडलेली सारी घटना फेसबुकवर शेअर केली आहे. या प्रकरणात पोलिसांची काय बाजू आहे, हे समजू शकलेले नाही. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने फिरते आहे.