पोप फ्रान्सिस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सेक्स आणि चांगलं खाण्यामुळे दैवी आनंद मिळतो असं वक्तव्य केलं आहे. कॅथॉलिक ख्रिश्चनांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या चर्चचे प्रगतशील धर्मगुरु म्हणून पोप फ्रान्सिस यांना ओळखलं जातं. पोप फ्रान्सिस यांनी लेखक कार्लो पेट्रिनी यांच्या टोरफ्यूचूरा (TerraFutura) या पुस्तकासाठी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केलं. शरीर संबंध आणि खाणं यासंदर्भात या पूर्वी करण्यात आलेले दावे आणि विचार यांच्यावर टीका करत या गोष्टी अधिक पवित्र आणि नैतिक आहेत असं म्हटलं आहे.

“जुन्या विचारांमुळे या विषयांसंदर्भात खूप नुकसान झालं असून त्याची झळ आजही जाणवते,” असं पोप फ्रान्सिस यांनी म्हटलं आहे. खाण्यातील आनंद हा तुम्हाला सुदृढ ठेवण्यासाठी आहे त्याच प्रमाणे शरीर संबंधांमधून मिळणारा आनंद हा प्रेम आणि अधिक सुंदर होण्याबरोबरच आपल्या पुढील पिढ्यांच्या निर्मितीसाठी गरजेचा आहे, असं पोप फ्रान्सिस म्हणाले. मात्र या दोन्ही गोष्टींसंदर्भात विरोधी विचारसरणीमुळे मोठं नुकसान झालं आहे. अनेक संदर्भांमध्ये हे नुकसान आजही आपल्याला जाणवते. खाणं आणि शरीर संबंधांमधून मिळणार आनंद हा दैवी असतो असं पोप फ्रान्सिस म्हणाले. यासंदर्भातील वृत्त ‘हफिंग्टन पोस्ट’ने दिलं आहे.

पोप फ्रान्सिस यांचा शरीर संबंधांसंदर्भातील दृष्टीकोन मागील काही वर्षांपासून प्रामुख्याने पुरोमागी विचारसणीनुसार अधिक व्यापक होत असल्याचे दिसून येत आहे. सन २०१६ मध्ये त्यांनी शरीर संबंधांमधून मिळणाऱ्या आनंदाबद्दल भाष्य करताना विवाहित जोडप्यांनी शरीरसंबंधांमधून मिळणारा आनंद कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं मत व्यक्त केलं. २०१८ मध्ये त्यांनी तरुणांसमोर भाषण करताना सेक्स म्हणजे एक पुरुष आणि महिलेमधील आयुष्यभराच्या प्रेमाचा भावूक संकेत आहे असं म्हटलं होतं.

बुधवारी प्रकाशित झालेल्या टोरफ्यूचूरा या पुस्तकाचे लेखक कार्लो पेट्रिनी हे ‘स्लो फूड’ आंदोलनाचे संस्थापक आहेत. १९८० च्या दशकामध्ये फास्ट फूड संस्कृती उदयास आल्यानंतर या संस्कृतीच्या विरोधी मतप्रवाहाची ‘स्लो फूड’ विचारसरणी पेट्रिनी यांनी मांडली आणि त्याचा पुरस्कार केला. या पुस्तकासाठी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये पोप यांच्या पर्यावरणसंदर्भातील विचारांबरोबरच सामाजिक विचारसरणीचा मागोवा घेण्यात आला आहे.