मानव आणि प्राणी यांच्यामधला संघर्ष कधीही न संपणारा आहे. आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी दोघंही झगडत आहे. हा संघर्ष पूर्वापार चालत आलेला आहे. त्यामुळे जगण्याच्या संघर्षात कोणा एका पक्षाचा बळी जाणार हा नियमच आहे. मानव आणि प्राण्यातल्या संघर्षाची ही कहाणी सांगणाऱ्या या फोटोला ‘सँक्च्युरी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी’चा पुरस्कार मिळाला आहे.

‘नरक इथेच आहे’, ‘hell is here’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आलेल्या या फोटोनं पुन्हा एकदा जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. बिप्लाब हजरा या फोटोग्राफरनं तो टिपला आहे. भारतात एकीकडे हत्तीची पूजा केली जाते. त्याला श्रीगणेशाचं रुप मानलं जातं तर दुसरीकडे याच गजराजाचा जीवही घ्यायला लोक मागे पुढे पाहत नाही, हे भीषण वास्तव हजरा यांनी आपल्या फोटोतून मांडलं आहे. हा फोटो पश्चिम बंगालमधला आहे, येथे हत्तींचा कळप आणि माणूस यांच्यातील संघर्ष आता नेहमीचाच झाला आहे. मानवानं जंगलावर अतिक्रमण केलं, मानवी हस्तक्षेपामुळे या प्राण्यांचे अधिवास नष्ट झाले, त्यामुळे साहजिकच आपली भूक भागवण्यासाठी हे प्राणी मानवी वस्तीकडे धावू लागले. भातपीकांचे, बागायतींचे नुकसान करू लागले. त्यांना हुसकावून लावण्यासाठी माणसांनी नाना क्लृप्त्या लढवल्या, पण या संघर्षातून मार्ग काही निघाला नाही. माणसं मेली तितकेच प्राणीही मारले गेले.

खूशखबर! २०१८ मध्येही कर्मचाऱ्यांवर सुट्ट्यांचा ‘पाऊस’

हा फोटो ज्यावेळी टिपण्यात आला त्यावेळी असाच संघर्ष गावात सुरू होता. शेतात शिरलेल्या हत्तीणी आणि तिच्या पिल्लावर आगीचे गोळे फेकून गावकरी त्यांना पळवून लावत होते, या संघर्षात पिल्लाचा पाय आगीमुळे भाजला. एकीकडे मानवी क्रूरता तर दुसरीकडे परिस्थितीपुढे हतबल असलेल्या आईचे दु:ख हे दोन्ही आपल्या कॅमेरात त्यांनी कैद केलं. ‘सँक्च्युरी एशिया’च्या फेसबुक पेजवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. कदाचित हे भयानक दृश्य पाहून परिस्थितीतून काहीतरी तोडगा निघेल एवढीच शेवटची आशा प्राणीप्रेमींनी वर्तवली आहे.

Video : यंत्रमानवानंतर आता यांत्रिक कुत्रा बाजारपेठेत; सोनीचा ‘आईबो’ लाँच