News Flash

प्रबोधनकार ठाकरे जयंती विशेष : ठाकरे घराणं मूळचं बिहारचंच, प्रबोधनकारांनी स्वत:च्या पुस्तकात केलेला खुलासा

'ठाकरे कुटुंब चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजातील आहे. इसवी सनपूर्व...'

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते केशव ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून प्रबोधनकारांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला. आपल्या एका पुस्तकामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांनी ठाकरे घराणं मूळचे बिहारचे असल्याचे म्हटले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोघांमधील नातेसंबंधांवर प्रकाश टाकणाऱ्या ‘द कझिन्स ठाकरे: उद्धव राज अॅण्ड द शॅडो ऑफ सेनाज’ पुस्तकामध्ये यासंदर्भातील उल्लेख प्रबोधनकारांच्या लेखणाच्या संदर्भात देण्यात आला आहे. पत्रकार धवल कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे पुस्तक २०१९ साली सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झालं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अनेकदा उत्तर भारतीयांचा विरोध केल्याचे दाखले सापडतात. मात्र ठाकरे कुटुंबाचे मूळ हे बिहारमधील असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. प्रबोधनकारांनी त्यांच्या ‘ग्रामण्याचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचे बंडखोर’ पुस्तकामध्ये ठाकरे कुटुंबाचे मूळ बिहारमधील असल्याचा संदर्भ दिल्याचे लेखकाने म्हटले आहे. ‘ठाकरे कुटुंब चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजातील आहे. इसवी सनपूर्व तिसऱ्या किंवा चौथ्या शतकामध्ये हा समाज महापद्म नंदाचे सम्राज खालसा झाल्यानंतर प्राचीन मगधमधून (सध्याचे बिहार) बाहेर पडले. मगधमधून बाहेर पडल्यानंतर या समाजातील व्यक्ती योद्धे आणि पंडीत म्हणून इतर ठिकाणी वास्तव्य करु लागले,’ असं प्रोबधनकार यांनी आपल्या पुस्तकात नमूद केल्याचे लेखकाने आपल्या पुस्तकात अधोरेखित केले आहे. महापद्म नंदा हे प्राचीन भारतामधील पहिले सर्वात मोठे सम्राज्य असल्याचे मानले जाते.

१९९३ साली डिसेंबर महिन्यामध्ये राज ठाकरेंनी नागपूरमध्ये पहिल्यांदाच बेरोजगार तरुणांच्या मोर्चाचे आयोजन केले. त्याचवेळी उद्धव आणि राज या चुलत भावांमध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरु झाल्याचे कुलकर्णी यांनी पुस्तकामध्ये म्हटले आहे. ‘नागपूरमधील या मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळणारे हे दिसून आल्यानंतर मोर्चाच्या दिवसाच्या आदल्या रात्री राज यांना मातोश्रीवरुन फोन आला. उद्धव यांनाही सार्वजनिक सभेमध्ये बोलण्याची संधी देण्यात यावी असं राज यांना सांगण्यात आले होते. त्यावेळी राज हे नागपूरमधील सेंटर पॉइंट हॉटेलमध्ये थांबले होते. हा फोन आल्यानंतर राज यांना उद्धव या मोर्चाच्या आयोजनाचे श्रेय घेऊन जातील अशी चिंता लागून राहिली होती,’ असा दावा लेखकाने ठाकरे कुटुंबियांच्या निकटवर्तीयाचा दाखला देत आपल्या पुस्तकात केला आहे. या पुस्तकामध्ये कुलकर्णी यांनी उद्धव आणि राज यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कशापद्धतीने वेगळा आहे यावरही भाष्य केले आहे.

राज आणि उद्धव यांच्यात जानेवारी २००६ मध्ये मतभेद इतक्या टोकाला पोहचले की राज यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. या पुस्तकामध्ये राज आणि उद्धव यांच्या नातेसंबंधांबरोबरच शिवसेना आणि मनसेचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक पैलूंवरही लेखकाने प्रकाश टाकला आहे.

(टीप: ही मूळ बातमी २० सप्टेंबर २०१९ रोजी द कझिन्स ठाकरे: उद्धव राज अॅण्ड द शॅडो ऑफ सेनाज’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर प्रकाशित करण्यात आली होती. मूळ बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 9:20 am

Web Title: prabodhankar thackeray birth anniversary he had mentioned in book thackeray family traces origin to bihar scsg 91
Next Stories
1 मोदींच्या वाढदिवशीच ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ ट्रेण्डमध्ये; दाढीऐवजी रोजगार वाढवण्याचा तरुणांचा खोचक सल्ला
2 “आक्रमण करणाऱ्यांचा सन्मान केला जातो असा भारत हा एकमेव देश”; पाकिस्तानी लेखकाचे वक्तव्य
3 Apple Watch Series 6 लाँच; ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर फिचरचाही समावेश
Just Now!
X