सध्या युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये केंद्र सरकारच्या एका नव्या योजनेबद्दल माहिती दिली असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओनुसार केंद्र सरकार आता सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’अंतर्गत दोन लाख २० हजार रुपये जमा करणार आहे. अशाप्रकारचे मेसेज सोशल नेटवर्किंगवरही व्हायरल केले जात आहे. मात्र तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर वेळीच सावध व्हा, कारण हा मेसेज खोटा आहे. केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर अकाऊंट असणाऱ्या पत्रसूचना विभागानेच (पीआयबी) फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ आणि यामधील माहिती खोटी असल्याचे सांगत ही अफवा असल्याचे शिक्कामोर्तब केलं आहे.

नक्की वाचा >> नवरात्रीदरम्यान रोज घर बसल्या कमावता येणार दोन हजार रुपये?

व्हॉट्सअपवर तर हा मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये देशभरामध्ये अनेकदा खोट्या बातम्या आणि अफवा सोशल मीडियावरुन व्हायरल होताना दिसतात. मात्र याच अशा व्हायरल मेसेजची सत्यता पडताळून त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेक टि्वटर हॅण्डल सुरु करण्यात आलं आहे. ऑनलाइन अफवांपासून लोकांची जागृती करण्याच्या उद्देशाने हे अकाऊंट सुरु करण्यात आलं आहे. याच फॅक्ट चेकमध्ये केंद्राची अशी कोणतीही योजना नसल्याची माहिती समोर आली आहे.

करोनाच्या कालावधीमध्ये अनेक खोट्या बातम्या व्हायरल होताना दिसत आहेत. भारत सरकारच्या पत्रसूचना विभागाने मागील अनेक आठवड्यांपासून या व्हायरल बातम्यांसंदर्भातील खुलासे वेळोवेळी केले आहेत. अशा खोट्या अफवा डिजीटल माध्यमातून पसरु नयेत म्हणून सरकारी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र या अफवांची संख्या कमी होताना दिसत नाहीय.

तुम्हाला असा खोटा मेसेज आल्यास…

तुम्हालाही अशाप्रकारचा एखादा सरकारी योजनेचा मेसेज आल्यास पीआयबीच्या फॅक्ट चेक साईटवर म्हणजेच https://factcheck.pib.gov.in/ वर तुम्ही त्याची सत्यता पडताळून पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपवरुन +91 8799 7112 59 या क्रमांकावर अथवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडी वरुन माहितीची सत्यता पडताळून घेऊ शकता. ही माहिती  https://pib.gov.in वरही उपलब्ध आहे.