मी मनमोहन सिंग यांच्यासारखा गुलाम नाही. मला जे योग्य वाटत आहे, ते मी करीत आहे. आज भारताला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तोडीचे संघटन आवश्यक आहे.. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नावे प्रसारित केले जात असलेले खोटे विधान शुद्ध खोडसाळपणा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुखर्जी यांच्या कार्यालयाने हे विधान बनावट असल्याचे म्हटले आहे. ‘ट्विटर’वर मुखर्जी असं म्हणाले याचा प्रसार अनेकांनी केला. परंतु, माजी राष्ट्रपतींनी कोणत्याही व्यासपीठावरून वा कार्यक्रमात अथवा पत्रकारांशी बोलताना अशा स्वरूपाचे विधान केले नसल्याचे  मुखर्जी यांच्या कार्यालयाने म्हटले आहे. ६ व ७ जून रोजी होणाऱ्या संघ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण स्वीकारल्यानंतर मुखर्जी यांच्याबद्दलचे बनावट विधान समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झाले आहे. या सोहळ्यात मुखर्जी साधारण ३० मिनिटे भाषण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मत व्यक्त केले होते. मुखर्जी यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. त्यावर आता वाद घालण्यात अर्थ नाही. परंतु सरांनी आता त्यांच्या भाषणात संघाची विचारसरणी आणि कृती यात कशी तफावत आहे, हे दाखवून द्यावे, असे चिदंबरम यांनी म्हटले होते.