अखेर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्येने शर्मिष्ठा मुखर्जी यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे. नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघशिक्षा वर्गाच्या समारोप समारंभाला उपस्थिती लावताच मुखर्जी यांचे संघाच्या शैलीत अभिवादन करतानाचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे.

व्यासपीठावरील संघाचे पदाधिकारी अभिवादन करत असताना मुखर्जी यांनी मात्र संघाच्या पद्धतीने अभिवादन करणे टाळले होते. तरीही मुखर्जी यांच्या छायाचित्रात फेरबदल करून त्यांच्या डोक्यावर संघाच्या गणवेशातील टोपी असलेली आणि अभिवादन करणारी प्रतिमा प्रसारित करण्यात आली आहे. शर्मिष्ठा यांनी मुखर्जी यांच्या संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. ‘तुमचे विचार विस्मृतीत जातील आणि केवळ छायाचित्रे खोटय़ा विधानांसह प्रसारित होतील,’ अशी भीती त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली होती. ही छायाचित्रे प्रसारित झाल्यानंतर ‘ज्याची भीती वाटत होती तसेच झाले आहे. अवघ्या काही तासांत भाजपचे गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे,’ अशी टीका करणारे ट्वीट शर्मिष्ठा यांनी शुक्रवारी केले आहे.