News Flash

७ महिन्यांची गरोदर असतानाही ती ३ दिवस राबली!

पालघरच्या सुशीला खुरकुटेने जिद्दीने बांधलं शौचालय

ध्येय एकच, घरात शौचालय बांधायचं!

गरोदरपणाचा काळ म्हणजे त्या स्त्रीच्या आयुष्यातला एक फार महत्त्वाचा काळ. या काळात तिच्यासोबत आणखी एक जीव तिच्यावर अवलंबून असतो. या काळात त्या स्त्रीचा नवरा, तिचे कुटुंबीय, सगळेच तिचे काळजी घेतात. जसजसे महिने भरत जातात तशी प्रकृतीची आणखी काळजी घ्यावी लागते.

पण सात महिने गरोदर सुशिला खुरकुटे याही अवस्थेत धैर्याने कामाला लागल्या त्यांच्या घराजवळ त्यांनी तब्बल तीन दिवस राबत खड्डा खणला. हे सगळं कशासाठी? तर आपल्या घराचं स्वतंत्र शौचालय असावं या एकाच ध्येयासाठी!

पालगर जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये राहणाऱ्या सुशीला खुरकुटेंचं हे तिसरं बाळंतपण.  गावातल्या अनेक घरांसारखंच त्यांच्या घरात शौचालय नव्हतं. त्यामुळे त्यांना उघड्यावर शौचाला जावं लागे. बाळंतपणाच्या अवस्थेत सुशीलाबाईंची साहजिकच अशा वेळी कुचंबणा होत असे. बाळंतपणाच्या काळात गरोदर महिलेला योग्य आहार मिळणं फार महत्त्वाचं असतं. पण शौचाला जावं लागेल या भीतीने त्या खाणं टाळत असत.

आपल्या तिसऱ्या बाळंतपणाच्या वेळी ही परिस्थिती बदलण्याचा त्यांनी निश्चय केला. गाव आणि शहरांमधल्या सोयीसुविधांबाबत आपण भारतीय कमालीचे उदासीन असतो. रस्ते हवेत? सरकार करेल ना. गावात शाळा हवी? अहो सरकारचंच ते काम. मग आता शौैचालयाची सुविधाही सरकारनेच उपलब्ध करून द्यायला हवी नाही का?

एका अर्थाने हे बरोबर आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणं हे सरकारचं कामच आहे. पण सुस्त सरकारी यंत्रणा हलायला अनेक वेळा कितीतरी वर्षं लागतात. आणि अनेकदा आपण आपल्या निष्क्रीयतेचं खापर सरकारवर फोडतो.

सुशीलाबाईंनी या सगळ्या विचारांमध्ये वेळ घालवलाच नाही. सात महिन्यांची गर्भावस्था असतानाही सुशीलाबाईंनी शौचालयासाठी खड्डा खणायला सुरूवात केली. सरकारी मदत येवो वा न येवो ती मदत मिळाल्यावर आपल्या बाजूने अपेक्षित असलेलं काम पूर्ण असलं पाहिजे याच एका उद्दिष्टाने त्या तब्बल तीन दिवस राबल्या.

व्हिडिओ: इथे शाळेत जायला सहा वर्षांची मुलं डोंगरकडा चढतात!

त्यांच्या गावातली धडधाकट माणसं सरकारने काम करण्याची वाट पाहत असताना सुशीलाबाईंनी दिलेल्या या एकाकी झगड्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं न जातं तरच नवल. त्यांच्या या प्रयत्नांची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आणि केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वर अय्यर यांनी ट्वीट करत सुशीलाबाईंच्या कष्टांची दखल घेतली

त्यांना आता सरकारने सगळ्या प्रकारची मदत करत शौचालय बांधून दिलंय. तसंच हागणदारीमुक्त गावाच्या राज्य सरकारच्या योजनेत सुशीला मुरकुटेंची गोष्ट सांगत जनजागृती केली जाते आहे.

त्यांच्या जिद्दीला मनापासून सलाम!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 10:30 am

Web Title: pregnant woman in maharashtra village works for three days with determination to build her own toilet sushila khurkute palghar swaccha bharat abhiyan
Next Stories
1 ११ व्या वर्षी दिली बारावीची परीक्षा
2 हे आहेत जागतिक कीर्तीचे मठ्ठ दरोडेखोर!
3 Viral : बॉसचा मेल आलाय ना भाऊ!
Just Now!
X