तुम्ही कधी कोणाची वाट पाहिली आहे का ? बस थांब्यावर किंवा विमानतळावर तुम्ही कधी कोणाची वाट पाहात थांबले आहात का ? जर तुम्ही कधीतरी कोणाची वाट पाहिली असेल तर ही गोष्ट किती कठीण आहे, याची तुम्हाला कल्पना असेल. अनेकदा मोठ्या पदावर असणाऱ्या लोकांमुळे अनेकांना वाट पाहावी लागते. मात्र जगातील सर्वाधिक सामर्थ्यवान व्यक्ती असणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांनादेखील कोणाची तरी वाट पाहावी लागली आहे.

इस्रायलचे माजी राष्ट्रपती शिमॉन पेरेझ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नुकतेच इस्रायलला जाऊन आले. यावेळी इस्रायलमधील तेल अवीवच्या बेल गुरियोच्या विमानतळावरुन परतताना ओबामा यांना बराच वेळ माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांची वाट पाहायला लागली. ओबामा विमानात पोहोचले, त्यांनी त्यांचा कोट काढून ठेवला तरीही बिल क्लिंटन काही विमानात आले नव्हते. त्यामुळे ओबामा विमानाच्या प्रवेशद्वारासमोर आले आणि क्लिंटन यांना बोलावू लागले.

विमानाच्या प्रवेशद्वारावर उभे असलेले ओबामा अनेकदा बिल क्लिंटन यांना हाका मारत होते. मात्र ओबामा यांचे इतर सहकारी आले तरी क्लिंटन काही विमानात येत होते. मग ओबामा यांनी बिल क्लिंटन यांना हाताने टाळ्या वाजवून ‘लेट्स गो बिल… लेट्स गो बिल…’, असे म्हणण्यास सुरुवात केली. यादरम्यान विमानातील एका कर्मचाऱ्याने काहीतरी म्हटल्याने ओबामांच्या चेहऱ्यावर हसू आले. ओबामांनी अनेक वेळा हाका मारल्याने अखेर बिल क्लिंटन विमानात आले. ओबामांनी त्यांना आलिंगन दिले आणि हे आजी माजी अध्यक्ष विमानात गेले. रशिया टुडे या वृत्तवाहिनीने याचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.