ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी बुधवारपासून भारत दौऱ्यावर आले आहेत. दिल्लीमध्ये त्यांचे अतिशय उत्साहात स्वागतही करण्यात आले. मात्र दिल्लीत सध्या मोठ्या प्रमाणात धुरके पसरले असल्याने तेथील स्थिती वाईट आहे. हे दांपत्य ११ दिवसांच्या आशिया दौऱ्यावर आले असून दिल्लीत गॅस चेंबरसारखी स्थिती आहे. पण या दाम्पत्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंवर बरेच विनोदही केले जात आहेत. याचे कारण म्हणजे धुरक्यामुळे या दाम्पत्याला आपण नेमका कोणाला शेकहँड करत आहोत ते कळत नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

ट्विटरवर त्यांच्यावर जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्यांचे फोटोही व्हायरल होत असून यामध्ये अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकजण म्हणतो, हे दोघेही आपण कोणाला शेकहँड करत आहोत ते अतिशय बारकाईने बघत आहेत. या धुरक्यामुळे हे दोघे लवकरच आपल्या देशात परत जातील असेही एकाने म्हटले आहे. हा प्रिन्स चार्ल्ससाठी लाईफटाईम अनुभव आहे. त्यामुळे ब्रिटनच्या दाम्पत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या भेटीत भारत आणि ब्रिटन या दोन देशांतील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.

दिल्लीमध्ये धुरक्याचे प्रमाण वाढल्याने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्याची विनंती केली. सलग दुसऱ्या दिवशी धुरक्यामुळे दिल्लीतील नागरिक त्रस्त झाले असून यामुळे श्वसनाचे आजार वाढू शकतात अशी भीती व्यक्त होत आहे. शाळा-महाविद्यालयांनाही सुटी देण्यात आली आहे. या ठिकाणच्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले असून आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. येथील हवेचा दर्जा खालावल्याचे दिसून आले. या ठिकाणी धुक्याचे आणि प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे.