सध्याचा काळ हा इंटरनेटचा काळ आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखादी छोटीशी घटना घडली, तरीही इंटरनेटच्या माध्यमातून ती सर्वत्र पसरते. भारतात गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर शवपेटी खांद्यावर घेऊन नाचणाऱ्या मुलांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर बऱ्याच प्रमाणात मिम्सही तयार झाली. पण शवपेटी घेऊन नाचणारी ही मंडळी आहेत तरी कोण?? असा प्रश्न अनेकांना पडला असेल…या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही देणार आहोत.

शवपेटी खांद्यावर घेऊन नाचणारी ही मंडळी आहेत मुळची घाना या देशातली. घानामधील स्थानिक प्रथेनुसार एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा ही वाजत-गाजत नेली जाते. गेली अनेक वर्ष सुरु असलेली ही प्रथा आजही घाना देशात सुरु आहे. याच प्रथेचा तिकडच्या काही तरुणांनी आपल्या रोजगारासाठी वापर करुन घेतला आहे. व्हिडीओत व्हायरल होत असलेल्या मुलांनी आपला एक ग्रुप तयार करत, अंत्ययात्रेसाठी काही खास डान्सस्टेप कोरिओग्राफ केल्या आहेत. यासाठी ते मृत व्यक्तीच्या परिवाराकडून पैसेही घेतात. आपल्या प्रिय व्यक्तीचा शेवटचा प्रवास संस्मरणीय व्हावा यासाठी घानामध्ये शवपेटी घेऊन नाचणाऱ्या या मंडळींना खूप मागणी आहे.

घानामध्ये आजही मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. अनेक लोकांकडे रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे या कामाद्वारे तरुण मंडळींना चांगलं काम मिळत आहे. अंत्ययात्रेत नाचणाऱ्या या व्यक्तींसाठी खास गणवेशही असतो. खांद्यावर घेऊन संगीताच्या तालावर नाचणे, जमिनीवर न ठेवता विविध पद्धतीमधून आपली कला दाखवणे या सर्व करामतींसाठी या मंडळींना चांगला पैसा मिळतो. याआधीही भारतात सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल झाले होते.