टाकाऊ पासून टिकाऊ हा शब्दप्रयोग आपण आतापर्यंत अनेकदा ऐकला असेल. लहानपणी निसर्गात उपलब्ध होणाऱ्या अनेक गोष्टींपासून उपयोगी वस्तू प्रत्येकाने बनवल्या आहेत. सध्याचं युग हे प्लास्टिकचं युग आहे. आपल्या स्वयंपाक घरापासून प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये प्लास्टिक हे असतचं. परंतू प्लास्टिकचा वाढता वापर हा पर्यावरणासाठी धोकादायक मानला जात आहे. अनेकदा नारळाचं पाणी पिताना आपण सहज प्लास्टिकची स्ट्रॉ वापरतो. परंतु बंगळुरुत इंग्रजी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांना काही वर्षांपूर्वी नारळाच्या झाडापासून स्ट्रॉ बनवण्याची कल्पना सूचली…आणि बघता बघता या कल्पनेला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळायला लागला.

बंगळुरुतील Christ University मध्ये ५१ वर्षीय साजी वर्गीस हे इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. आपल्याला ही कल्पना कशी सुचली याबद्दल साजी म्हणाले, “प्रत्येक वर्षी नारळाच्या झाडाची पानं सुकून खाली पडतात. ग्रामीण भागात ही पानं बहुतांशवेळा जाळली जातात किंवा त्याचा इतर कामांसाठ वापर होतो. २०१७ साली मला नारळाच्या झाडाच्या पानांपासून नैसर्गिक उत्पादन तयार करण्याची कल्पना सुचली.” दोन वर्षांच्या अभ्यासानंतर साजी यांनी नारळाच्या झाडाची स्ट्रॉ तयार केली. सुरुवातीला आपल्या स्थानिक भागांत साजी ही स्ट्रॉ ३ ते १० रुपयांत विकत होते. काही दिवसांनी साजी यांनी बाजारात हे प्रोडक्ट लॉन्च केलं, त्यानंतर तब्बल १० देशांमधून २० लाखांपेक्षा जास्त स्ट्रॉ ची मागणी साजी यांना मिळाली आहे. ‘द बेटर इंडिया’ संकेतस्थळाशी बोलताना साजी यांनी माहिती दिली.

२०१८ साली साजी यांनी आपल्या उत्पादनासाठी पेटंट मिळवलं असून त्यांचं हे उत्पादन बाजारात सनबर्ड स्ट्रॉ म्हणून प्रसिद्ध आहे. “ज्यावेळी मी स्ट्रॉ बनवण्यास सुरुवात केली त्यावेळी पानं स्वच्छ करण्यासाठी मी ती वाफवून घ्यायचो. पण काही दिवसांनी पानांवरचा भाग हा नैसर्गिकरित्या वेगळा होतो हे मला लक्षात आलं. याचा वापर करत स्ट्रॉ जंतूनाशक बनवण्यासाठी व्हायला लागला. २०१७ साली मी सर्वात प्रथम एक पदर असलेली स्ट्रॉ तयार केली. पण त्यानंतर माझे काही विद्यार्थी आणि इतर सहकाऱ्यांच्या साथीने स्ट्रॉचं उत्पादन बनवण्यासाठी घरातचं मशिनरी तयार केली. ज्यानंतर माझं उत्पादन वाढलं.”

साजी यांच्यासोबत काम करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रकारच्या पेयासाठी या स्ट्रॉचा वापर करुन बघितला. पाणी असो किंवा शीतपेय, मिल्कशेक…किंवा इतर कोणतीही पेय..४ ते ८ इंचाची ही स्ट्रॉ किमान सहा महिने टिकू शकते. ज्यामुळे जवळपासची हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये याची मागणी वाढायला लागली. नाराळाच्या पानाला ३ पद्धतीने साफ करुन घेतल्यानंतर या स्ट्रॉवर नैसर्गिक जंतूनाशकं वापरली जातात याची आम्ही काळजी घेतो अशी माहिती चिराग या विद्यार्थ्याने दिली. सुरुवातीला साजी यांच्या युनिव्हर्सिटीने या प्रकल्पाला अर्थसहाय्य केलं. मात्र या स्ट्रॉ ना मिळणारी प्रसिद्धी पाहता, यानंतर Accenture, HCL या कॉर्पोरेट कंपन्यांनी अहमदाबादमधील Entrepreneurship Development Institute of India च्या माध्यमातून साजी यांच्या प्रकल्पाला अर्थसहाय्य मिळून दिलं.

आपल्या प्रकल्पाला अर्थसहाय्य मिळाल्यानंतर साजी यांनी ग्रामीण भागातील महिलांना या प्रकल्पात सामावून घेण्याचं ठरवलं. आमच्या उत्पादनासाठी लागणारा बहुतांश माल हा ग्रामीण भागातून येत असल्यामुळे आम्ही त्यांना रोजगार मिळेल या हेतूने त्यांची मदत घेतली. विशेषकरुन महिलांना आम्ही प्राधान्य दिलं असं साजी यांनी सांगितलं. सध्या मदुराई, कासरगोड, तुतिकोरीन अशा ३ ठिकाणी साजी यांचं उत्पादन सुरु असून १८ महिला साजी यांच्या छोटेखानी कंपनीत कामाला आहेत. आगामी काळात देशभरातील ग्रामीण भागात हा प्रकल्प वाढवण्याचं साजी यांचं उद्दीष्ट आहे. साजी यांच्या उत्पादनाला सध्या अमेरिका, मलेशिया, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, फिलीपिन्स यासारख्या देशांमधून मागणी आहे. काही दिवसांपूर्वी JW Marriot हॉटेलने आमच्याशी संपर्क साधून आम्हाला ऑर्डर दिली असं साजी यांनी सांगितलं.