PUBG गेम चांगलाच लोकप्रिय आहे. लॉकडाउनदरम्यान तर या गेमकडे अनेकांचा कल वाढलाय. पण या गेमचं अनेकांना व्यसन जडल्याचंही समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने पब्जी खेळण्याच्या नादात वडिलांचं बँक अकाउंट रिकामं केल्याचं वृत्त आलं होतं. असंच वृत्त आता पंजाबमधून आलं आहे.

पंजाबच्या मोहालीमध्ये एका १५ वर्षांच्या तरुणाने पब्जी खेळण्यासाठी आपल्या आजोबांच्या बँक अकाउंटचा गैरवापर केला आणि दोन लाख रुपये या गेमसाठी खर्च केले. युवकाच्या काकांनी याबाबत Tribune India ला महिती देताना सांगितले की, जानेवारी महिन्यापासून हा मुलगा पब्जी खेळत होता. शाळेतल्या काही सिनियर्सकडून त्याला पब्जीचे ‘धडे’ मिळाले होते. त्याच्या सिनियर्सनी त्याला गेमसाठी काही खरेदी करायचं असल्यास(In-App Purchases) मोबाइल पेमेंट कसं करावं याबाबतही माहिती दिली होती असं त्याच्या काकांनी सांगितलं.

त्यानंतर मुलाने आजोबांच्या बँक अकाउंटचा गैरवापर करण्यास सुरूवात केली, हे अकाउंट आजोबांच्या पेन्शनचं अकाउंट होतं, असं त्याच्या काकांनी सांगितलं. मुलाने त्या बँक अकाउंटमधून गेल्या दोन महिन्यात जवळपास 30 पेमेंट्स करुन 55,000 रुपये खर्च केले होते. मुलाच्या काकांनी बँक स्टेटमेंट बघितल्यावर ते चांगलेच हैराण झाले, कारण त्यातील निम्म्यापेक्षा जास्त पेमेंट फक्त पब्जीसाठी करण्यात आलं होतं. काकांनी मुलाला खडसावून विचारल्यानंतर त्याने पब्जीसाठी दोन लाख रुपये खर्च केल्याची कबुली दिली. पब्जी खेळण्यासा्ठी वेगळं सिम कार्डही खरेदी केलं होतं असंही त्याने पालकांना सांगितलं. यानंतर त्या मुलाच्या कुटुंबियांनी मोहालीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक कुलदिपसिंग चहल यांच्याकडे इमेलद्वारे पब्जी शिकवणाऱ्या सिनियर विद्यार्थ्यांची तक्रार केली आहे.