कुत्रा हा माणसाचा अत्यंत जवळचा मित्र आहे असं म्हटलं जातं. पाहायला गेलं तर ते खरंदेखील आहे. नि:स्वार्थ मनाने हा मुका जीव आपल्या मालकावर प्रेम करत असतो, अनेक वेळा त्याच्यावर येणारं संकट दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. विशेष म्हणजे कुत्रा हा अत्यंत प्रामाणिक प्राणी असून बऱ्याच वेळा तो माणसांच्याही मदतीला येत असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर अनेक वेळा कुत्र्यांचे असे काही व्हिडीओ व्हायरलही झाले आहेत. मात्र सध्या येथील पुण्यातील एका कुत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चिला जात आहे. एका अंध व्यक्तीच्या मार्गात आलेली लाकडाची काठी बाजूला सारुन या कुत्र्याने त्या व्यक्तीला मदत केली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर कुत्र्याच्या माणुसकीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. २० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये कुत्रा आपल्या मालकीणीसोबत निघाला आहे. त्याचवेळी एका अंध व्यक्तीही त्याच मार्गानं जात होता. त्याच रस्त्यावर एक लाकूड आडवे होतं. कुत्र्याच्या त्याच क्षणी लक्षात आलं की, अंध व्यक्तीचा पाय लाकड्याच्या काठीमध्ये अडकून तो पडू शकतो. त्यावेळी कुत्र्यानं ते लाकूड  आपल्या तोंडानं रस्त्याच्या बाजूला सारलं. कुत्रा घेऊन फिरायला येणाऱ्या मालकीणीने ते लाकूड पाहिलं पण बाजूला सारायचा विचारही केला नाही. पण कुत्र्यानं आपल्यातील माणूसकी दाखवून दिली.

२३ सेकंदांच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. सहा लाख ४७ हजार जणांनी पाहिलं आहे. तर पाच हजार जणांनी रिट्विट केलं आहे.