एखाद्या कंपनीची जाहिरातबाजी करणारे मोठेच्या मोठे फलक तुम्हाला चौकाचौकात दिसतील. मोक्याची जागा दिसली की तिथे आपल्या उत्पादनांची जाहिरात करणारा फलक लावण्यासाठी जाहिरातदार वाट्टेल तेवढे पैसे मोजतात. तेव्हा गल्ली बोळ्यातल्या मोक्याच्या ठिकाणी तुम्हाला विविध कंपन्याचे असे ढिगभर फलक दिसतील. पण जर का तुम्ही पुण्याच्या रस्त्यावरील काही होर्डिंग्जवर नजर टाकली, तर एक वेगळाच प्रकार तुमच्या लक्षात येईल. या व्हायरल झालेल्या फोटोत नीट निरखून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की रस्त्यावर फलक तर लावलाय पण त्या फलकामधून ठिकठिकाणी टोकदार सळई बाहेर आले आहे.

वाचा : जाणून घ्या राम रहिमची दत्तक मुलगी हनीप्रीत आहे तरी कोण?

फलकांची ही भानगड नेमकी आहे काय? असा प्रश्न पक्के पुणेकर सोडून इतरांना साहजिकच पडला असेल. तेव्हा फार वेळ न दवडता या फलकामागची भानगड तुम्हाला सांगतो. त्याच काय आहे आपल्या जाहिरातीच्या फलकाचं कोणी नुकसान करु नये किंवा त्याच्यावर कोणी दुसरा फलक लावू नये यासाठी पुणेकरांनी ही भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. जाहिरातदार बिचारे मोक्याच्या ठिकाणी फलक लावण्याकरता वाट्टेल तेवढे पैसे मोजतात पण काही उपटसुंभे या फलकांच्या जागी स्वत:च्या पक्षाचा किंवा नेत्याला शुभेच्छा वगैरे देणारे बॅनर फुकटात लावतात. त्यामुळे पैसे देऊनही मूळ जाहिरातदारांचा बॅनर मागे राहतो. आता पैसे आपण दिलेत आणि फायदा कोणाला तिसऱ्याला होणार हे कोणीही जाहिरातदार का सहन करेल? तेव्हा अशा लोकांना रोखण्यासाठी जाहिरातदारांनी ही भन्नाट शक्कल शोधून काढली आहे.

Viral Video : पितृपक्षात कावळ्याला बळजबरीने भरवला जातोय पिंड, सत्य मात्र वेगळंच

त्यासाठी पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील चौकात अशा प्रकारे अधिकृत जाहिरात फलकांच्या मधून काही सळया बाहेर काढण्यात आल्या आहेत. यामुळे पैसे दिलेल्या एजन्सीची किंवा कंपनीची जाहिरात करण्यात आली आहे. पण त्यामुळे इतर कोणालाही आधीच्या फलकावर आपला फलक लावता येणार नाही. तसे केल्यास त्याचा फलकच फाटण्याची शक्यता आहे. पुणेकरांनी लढवलेली ही शक्कल सध्या काही ठिकाणी चर्चेचा विषय बनली आहे.