भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे चाहते जगभरात आहे. त्याचे निस्सिम चाहते त्याच्यासाठी काय करतील याचा नेम नाही. पुण्यातल्या त्याच्या एका मराठी चाहत्यानं धोनीसाठी रॅप साँग तयार केलं आहे. पुण्याच्या गहुंजे क्रिकेट स्टेडिअममध्ये आज चेन्नई सुपर किंग विरुद्ध राजस्थान रॉयल असा सामना रंगणार आहे आणि त्यानिमित्तानं स्वप्नील बनसोडे या पुणेकर चाहत्यानं ‘दे दणा दण’ गाणं तयार केलं आहे.

सध्या देशभरात आय.पी.एल चा फिव्हर आहे. त्यामुळे चाहते आपल्या संघासाठी आणि आवडत्या क्रिकेटरसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात. स्वप्नीलने देखील अशाच प्रकारे धोनीसाठी खास रॅप साँग तयार केलं असून चेन्नई सुपर किंगला पाठिंबा दर्शविला आहे. चाकणमध्ये स्वप्नीलचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान आहे. त्यावरच त्याची उपजीविका भागते. परंतु आवड म्हणून तो रॅप तयार करतो. रॅपर व्हायचं स्वप्नीलचं स्वप्न आहे. चार वर्षांपूर्वी स्वप्नील टीव्ही वर रॅप साँग पाहत होता त्यावेळी त्याला आपणदेखील रॅप साँग करू शकतो असा विश्वास निर्माण झाला. त्याने त्यावर खूप मेहनत घेतली आणि २०१५ च्या विश्वचषकसाठी ‘अरे अपनी जीत तो होनी है कप्तान महेंद्र सिंग धोनी है’ अस पहिलं रॅप साँग तयार केलं. ते खूपच व्हायरल झालं होतं.

त्यानं  तयार केलेलं हे गाणं धोनीनंदेखील ऐकावं, संघानं आजच्या सामन्यात विजय मिळवून या गाण्यावर थिरकावं अशी स्वप्नीलची इच्छा आहे. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.