पंजाब हरयाणा उच्च न्यायालयातील वकिलानं आपल्या पत्नीला पोटगी म्हणून चक्क २५ हजारांची चिल्लर बॅगेत भरून दिली आहे. १ आणि २ रुपयांच्या नाण्यांनी भरलेली बॅग त्यानं पत्नीकडे दिली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून  पतीनं पोटगी दिली नसल्याचा आरोप करत तिनं न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायलयानं तातडीनं दोन महिन्यांच्या पोटगीची रक्कम म्हणजे ५० हजार रुपये तिला देण्याचे आदेश दिले. मात्र पेशानं वकील असलेल्या या व्यक्तीनं चिल्लर पत्नीच्या पुढ्यात ठेवली.

‘हा मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न आहे. एवढ्या मोठ्या रक्कमेची चिल्लर कोणतीही बँक स्विकारणार नाही. त्यानं २४ हजार ६०० रुपयांची चिल्लर माझ्या पुढ्यात ठेवली तर शंभर रुपयांच्या चार नोटा मला दिल्या. हा माझा आणि कायदाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया पत्नीनं दिली आहे. २०१५ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर पत्नीला दरमहा २५ हजारांची पोटगी देण्याचा आदेश कोर्टानं त्याला दिला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यानं पोटगी पत्नीला दिली नाही.

आर्थिक चणचण असल्यानं मी पोटगी देऊ शकलो नाही. न्यायालयाच्या आदेशानंतर मला ज्या स्वरुपात पैसे मिळाले ते मी दिले. पोटगीची रक्कम १००, २०० किंवा ५०० रुपयांच्या नोटेच्या स्वरुपात द्यावी असं कुठेही नमूद करण्यात आलं नाही त्यामुळे मी काहीही चुकीचं केलं नाही अशी प्रतिक्रिया वकिलानं दिली आहे.