18 November 2017

News Flash

Viral Video : राणीच्या सुरक्षारक्षकांशी पंगा घ्याल तर रट्टे पडणार!

इथे शिस्त म्हणजे शिस्त

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 19, 2017 5:36 PM

(छाया आणि व्हिडिओ सौजन्य : Hector Alejandro/ युट्युब)

ब्रीटनच्या राणीबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता आहे. आता इंग्लडमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये एकदा का होईना पण या राणीला दूरून पाहण्याची इच्छा असतेच. राणीची साधी सावली तरी पाहायला मिळणं म्हणजे नशीब लागतं. आता राणीला पाहण्याचं भाग्य येईल तेव्हा येईल. पण काही हौशी पर्यटक दूरून राणीच्या महालाशेजारी उभे राहून फोटो काढून किंवा सेल्फी काढून आपली हौस भागवून घेत असतात.

इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये ‘विंडसर कॅसल’ प्रसिद्ध आहे. इथे राणीचे शाही सुरक्षारक्षक पारंपारिक वेशात परेड करतात. ही परेड पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी येथे पाहायला मिळते. आता काही पर्यटक एवढे उत्साही असतात की त्यांना फोटो वगैरे काढण्याची खूपच घाई असते. बरं आता फोटो काढायला कुठून आलीय बंदी? कुठेही जायचं, उभं राहायचं, सेल्फी काढायचा असा एकंदर पर्यटकांचा समज असतो. तेव्हा पर्यटक काय आपल्या मनात येईल तसं वागतात. पण राणीच्या राज्यात असं बिलकूल चालत नाही. इथे शिस्त म्हणजे शिस्त. शिस्तीचं उल्लंघन केलं तर तुमची काही खैर नाही. कारण राणीचे सुरक्षारक्षक असे काही अंगावर येतील की पुन्हा शिस्त मोडायची हिंमतही होणार नाही. आता हा व्हिडिओच बघा ना. फोटो काढण्यासाठी विंडसर किल्ल्याच्या अतिशय जवळ गेलेल्या एका पर्यटकाला राणीच्या सुरक्षारक्षकाने चक्क हुसकावून लावलं. या सुरक्षारक्षकाचं खेकसणं ऐकल्यावर त्या बिचाऱ्याला किती वरमल्यासारखे झाले असणार. पण इथे असंच चालतं. सामान्य नागरिकांनी नेहमीच शिस्तीचं पालन करून वागणं अपेक्षित असतं, जर एखादा बेशिस्त वागला तर हे शाही सुरक्षारक्षक रट्टे द्यायलाही कचरत नाहीत.

या सुरक्षारक्षकांना तो अधिकार देण्यात आला आहे. तेव्हा लोकांना मारहाण करण्याचे किंवा शिवीगाळ करण्याचे अनेक व्हिडिओ समोर येतच असतात. त्यातलाच हा एक. तेव्हा भविष्यात इथे भेट देण्याची वेळ आली तर राणीच्या महालापासून आणि सुरक्षकारक्षकांपासून दोन हात लांब राहिलेलंच बरं नाही का! नाहीतर आपल्यालाही असे वाईट अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.

First Published on May 19, 2017 5:36 pm

Web Title: queens guard yells at tourist windsor castle