भारताचा फिरकीपटू आर. अश्विनच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव २८७ धावांत आटोपला. अनुभवी अश्विनने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत ४ बळी टिपले. अश्विनने इंग्लंडचा दिग्गज फलंदाज अॅलिस्टर कुकला आठव्यांदा बाद केले. काल सामना सुरु झाल्यानंतर नवव्या षटकांत अश्विने कुकच्या यष्ट्या उडवत भारताला पहिले यश मिळवून दिले होते. कुकने १३ धावांची खेळी केली.

याबरोबरच कुक आपला सर्वात आवडता शिकार असल्याचे अश्विनने पुन्हा एकदा सिद्ध केले. कसोटी सामन्यात कुकला आतापर्यंत आठ वेळा दोन फिरकी गोलंदाजांनी बाद केले आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लिऑन आणि आर. अश्निन यांनी कुकला आठ वेळा बाद केले आहे. अश्विन शिवाय रवींद्र जाडेजाने कुकला सात वेळा बाद केले आहे. कुकला सर्वाधिक वेळा बाद करणाऱ्यांमध्ये अश्विन नॅथन लिऑनसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. कुकशिवाय अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड वॉर्नरला नऊ वेळा बाद केले आहे.

अश्विनने पहिल्या दिवशी ६० धावा देताना चार फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवला. आशियाच्या बाहेर पहिल्या दिवशी चार बळी घेणारा अश्विन चौथा फिरकी गोलंदाज ठरला आहे. भारताकडून याआधी माजी फिरकी गोलंदाज बी. चंद्रशेखर यांनी १९७६ मध्ये पहिल्या दिवशी ९४ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले होते.

भारताची अडखळत सुरुवात –

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव २८७ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडतर्फे कर्णधार रूटने सर्वाधिक ८० धावा केल्या. तर बेअरस्टोने ७० धावांची खेळी केली. अश्विनने ४ तर मोहम्मद शमीने ३ बळी टिपले. त्यानंतर भारताच्या डावाला सुरुवात झाली. भारताने बिनबाद ५० धावा केल्या होत्या. त्यानंतर मात्र मुरली विजय, लोकेश राहुल आणि शिखर धवन तिघे झटपट बाद झाले. सध्या कर्णधार विराट कोहली ९ तर अजिंक्य रहाणे ८ धावांवर खेळत आहे.