एकीकडे धर्माच्या नावे हिंसाचार सुरु असताना मेरठमधील एक मुस्लीम लग्नाची पत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. लग्नाच्या या पत्रिकेवर हिंदू देवतांचे फोटो छापण्यात आले आहेत. मुस्लीम व्यक्तीने या पत्रिकेतून धार्मिक सलोख्याचं उदाहरण दिलं आहे. पत्रिकेवर गणपती आणि राधा-कृष्णाचा फोटो छापण्यात आला असून चाँद मुबारक असंही लिहिण्यात आलं आहे.

ही अनोखी पत्रिका हस्तिनापूर येथे राहत असलेल्या मोहम्मद शराफत यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी छापली आहे. त्यांची मुलगी आसमा खातूनचा ४ मार्च रोजी निकाह होणार आहे.

“देशात एकीकडे धार्मिक द्वेष वाढत असताना हिंदू मुस्लीम ऐक्य दाखवण्यासाठी ही चांगली कल्पना असल्याचं मला वाटलं. माझ्या या निर्णयाला मित्रांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,” असं मोहम्मद शराफत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मोहम्मद शराफत यांनी मित्र आणि नातेवाईकांसाठी उर्दू भाषेत वेगळी लग्नपत्रिका छापली आहे. माझे अनेक नातेवाईक आणि मित्र आहेत ज्यांना हिंदू वाचता येत नाही. त्यांच्यासाठी मी उर्दू भाषेतही लग्नपत्रिका छापली आहे असं मोहम्मद शराफत यांनी म्हटलं आहे.