18 October 2019

News Flash

नाक आणि छोटया चेंडूमध्ये दडलंय राफेलचं ‘सिक्रेट’

राफेल विमान हे फ्रान्सच्या इंजिनिअरींग कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे. हवाई युद्धामध्ये शत्रूने तुम्हाला शोधण्याआधी तुम्ही त्याला शोधून संपवणं महत्वाचं असतं.

दसऱ्याच्या मुहूर्तावर भारतीय हवाई दलाला राफेल नावाचं एक नवीन शस्त्र मिळालं. या फायटर विमानामध्ये युद्धाचं गणित बदलून टाकण्याची क्षमता आहे. राफेलला सुपरस्टार ऑफ द स्काय म्हटलं जातं. त्यामागे कारण सुद्धा तितकचं खास आहे. एसयू-३५, मिग-३५ आणि युरोफायटर टायफून या स्पर्धक कंपन्यांच्या फायटर विमानांच्या तुलनेत राफेल पूर्णपणे उजवं आहे.

शत्रूच्या शक्तीस्थळांवर अचूक प्रहार करुन स्वत:चा बचाव करण्याचं तंत्रज्ञानामुळे राफेल इतर विमानांपेक्षा वेगळं ठरतं. सीरिया, इराक, माली आणि लिबिया युद्धात राफेलने संपूर्ण जगाला आपल्या क्षमतेची चुणूक दाखवून दिली.
राफेलच्या जन्माची सुरुवात १९८० च्या दशकात झाली. त्यावेळी फ्रान्स, पश्चिम जर्मनी, इटली, स्पेन आणि युनायटेड किंगडम या देशांनी एकत्र येऊन युरोपच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायटर विमान बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला. पण लवकरच प्रत्येक देशाची लष्करी गरज आणि रणनिती वेगळी असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर फ्रान्सने १९८५ साली या प्रकल्पातून माघार घेत असल्याची घोषणा केली व स्वतंत्रपणे फायटर विमानाच्या निर्मितीवर काम सुरु केलं.

१९८६ साली राफेलचं पहिलं प्रोटोटाइप जगासमोर आलं. ४ जुलै १९८६ रोजी राफेल ए ने आकाशात यशस्वी झेप घेतली. त्यावेळी ताशी १३०० किलोमीटर या विमानाचा वेग होता. पहिल्याच उड्डाणात राफेल सर्वांच्या पसंतीला उतरलं. १९८७ साली फ्रान्स सरकारकडून अधिकृतरित्या राफेल प्रकल्पावर काम सुरु झालं. सर्वप्रथम २००४ साली राफेल फ्रान्सच्या नौदलात दाखलं झालं. त्यानंतर २००६ पासून फ्रान्सच्या हवाई दलाने राफेलचा वापर सुरु केला.

राफेलचं वैशिष्टय म्हणजे ते एका मल्टीरोल फायटर विमान आहे. राफेलचा जन्म होण्याआधी टेहळणी, बॉम्बिंग, अण्वस्त्र हल्ला यासाठी वेगवेगळी विमानं लागायची. पण आता एकटे राफेल ही सर्व कामे करण्यासाठी सक्षम आहे. आठ विमानांची काम एकटं राफेल करु शकते. म्हणून या विमानाला मल्टीरोल फायटर जेट म्हटलं जातं.

हवेत झेपावल्यानंतर अवघ्या दोन मिनिटात राफेल १० हजार मीटर उंचीवर जाऊ शकते. हा रॉकेट उड्डाणासारखा अनुभव असतो असं राफेल चालवणारे वैमानिक सांगतात. राफेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या विमानाची इलेक्ट्रॉनिक सिस्टिम, रडार आणि शस्त्रास्त्र विकसित करण्याचं काम सतत सरु असतं. त्यामुळे आज फोर प्लस जनरेशनचं असलेलं हे विमान उद्या ५ जनरेशनमध्ये बदलल्यास आश्चर्य वाटणार नाही.

राफेल विमान हे फ्रान्सच्या इंजिनिअरींग कौशल्याचं उत्तम उदाहरण आहे. या विमानात २५ किलोमीटर वायरींग असून ३० हजार प्रिसिशन पार्ट्स आहेत. असंख्य इलेक्ट्रॉनिक सर्किट या विमानात आहेत. २० हजार मीटर उंचीवरुन उड्डाण करु शकणाऱ्या या विमानाचा ताशी वेग २,१३० किलोमीटर आहे.

हवाई युद्धामध्ये शत्रूने तुम्हाला शोधण्याआधी तुम्ही त्याला शोधून संपवणं महत्वाचं असतं. त्या दृष्टीन राफेलमध्ये क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. राफेलच्या नाकामध्ये मल्टीडायरेक्शनल रडार सिस्टिम आहे. युरोपमध्ये हे युनिक तंत्रज्ञान आहे. १०० किलोमीटरच्या रेंजमधील एकाचवेळी ४० टार्गेट शोधण्याची क्षमता यामध्ये आहे. राफेलच्या कॉकपीटजवळ छोटया चेंडूच्या आकाराचा ऑप्टीकल कॅमरा सुद्धा या विमानाचं शक्तीस्थळ आहे. रडारने शोधलेल्या टार्गेटसचा माग या कॅमेऱ्याच्या मदतीने काढता येतो. हा कॅमेरा म्हणजे विमानाची दुर्बिण आहे. त्यामुळे राफेलची अचूकतेने प्रहार करण्याची क्षमता कैकपटीने वाढते. राफेलमध्ये एक खास डिजिटल कॅमेरा बसवलेला असून विमान कितीही स्पीडमध्ये असले तरी हा कॅमेरा लक्ष्याचे अचूक फोटो काढू शकतो.

स्पेक्ट्रा हे राफेलचं सुरक्षा कवच आहे. स्पेक्ट्रा शत्रूचे रडार जॅम करते. त्यामुळे शत्रूच्या रडारला राफेलचा शोध लावता येत नाही. विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची माहिती सुद्धा स्पेक्ट्रा सिस्टिमकडून मिळते. रडार जॅम केल्यानंतरही एखादे क्षेपणास्त्र विमानाच्या जवळ आले तर विमानातून निघणारे इलेक्ट्रो मॅग्नॅटिक प्लस विमानाच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राची दिशा बदलतात. हे विमान बनवताना शक्य तितके स्टेल्थ तंत्रज्ञान वापरुन शत्रूच्या हाताला लागणार नाही अशा पद्धतीने बनवण्यात आले आहे.

राफेलमध्ये १६ टन शस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. शस्त्रास्त्रांची क्षमताच राफेलला अधिक घातक बनवते. मिका, मिटिओर, स्काल्प ही बियाँड व्हिज्युअल रेंज मिसाईल या विमानामध्ये आहेत. या मिसाइल्सना फायर अँड फरगेट म्हटले जाते. वैमानिकाने एकदा का ही क्षेपणास्त्र डागली कि लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने प्रहार करतात. बचाव आणि हल्ला करण्याच्या क्षमतेमुळेच राफेल इतर फायटर विमानांच्या तुलनेत वेगळे ठरते.

First Published on October 10, 2019 7:03 pm

Web Title: rafale fighter jet india purchase from france dmp 82