करोनामुळे जगभरातील वेगवेगळ्या देशामध्ये सुरु असणाऱ्या लॉकडाउनचा निसर्गावर सकारात्मक परिणाम झाल्याची चर्चा इंटरनेटवर आहे. यासंदर्भातील वेगवेगळ्या अभ्यासांमधूनही खरोखरच निसर्गामध्ये सकारात्मक बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. याच सकारात्मक बदलाचे एक रुप भारतामधील राजस्थानमध्ये पाहायला मिळालं आहे. येथील एका गावामधील मानवी वस्तीजवळच्या एका पडक्या घरामध्ये बिबट्याची मादीचा तिच्या तीन बछड्यांसहीत अधिवास असल्याची माहिती समोर आली आहे. आनंदाची बाब म्हणजे या बिबट्यांवर सतत लक्ष ठेवण्याचा निर्णय वन खात्याने घेतला असून त्यासाठी कॅमेराही बसवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील तंतोल गावामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका पडक्या घरात मादी आणि तीन बछडे राहत आहेत. वन खात्याला यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी या बिबट्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. कोणीही या बिबट्यांना त्रास देऊ नये याची संपूर्ण काळजी वनखात्या मार्फत घेतली जात आहे.

वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या घरावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवल्याचे सांगण्यात येत आहे. गावातील नागरिक आणि बिबट्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये काम करणारे अधिकारी प्रविण कासवान यांनी या बिबट्यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. “ही मादी रात्री या घरामध्ये असणाऱ्या आपल्या बछड्यांबरोबर राहते तर दिवसा शिकारीसाठी जाते,” अशी माहिती कासवान यांनी दिली आहे.

कासवान बिबट्याच्या बछड्यांचा फोटोही ट्विट केला आहे. राजस्थान पत्रिका या वृत्तपत्राने बिबट्याचे बछडे सुखरुप असल्याची बातमी दिल्याचे कासवान यांनी म्हटलं असून वृत्तपत्राच्या हवाल्याने त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे.

हा व्हिडिओ ३५ हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.