रक्षाबंधनच्या दिवशी भावाला प्रत्येक बहिणीनी भेट म्हणून हेल्मेट देण्याची नवी मोहिम सोशल मीडियावर सुरू झाली आहे. हेल्मेट देण्याच्या हा नव्या ट्रेंडची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. हा ट्रेंड किंवा ही मोहिम नक्की काय आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर याबद्दल प्रत्येक बहिणींनी जाणून घ्यायलाच हवं. गाझियाबादच्या खासदार कविता यांनी ऑनलाइन मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक बहिणींनी रक्षाबंधनला आपल्या भावाला हेल्मेट भेट म्हणून देण्याचं आव्हान त्यांनी व्हिडिओद्वारे केलंय. रस्ते अपघात टाळण्यासाठी त्यांनी ही मोहिम सुरू केली आहे.

दरदिवशी रस्ते अपघात शेकडो लोकांचा बळी जातो. दुचाकीवरुन अपघात होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. अनेकदा हेल्मेट न घातल्याने कित्येकांचे प्राण गेलेत. गाडी चालवताना हेल्मेट वापरण्याची सक्ती असली तरी अनेकजण हे नियम पाळत नाही तेव्हा बहिणींनी स्वत: पुढाकार घेऊन भावांच्या सुरक्षेसाठी त्यांना हेल्मेट भेट म्हणून द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. आजच्या दिवशी भाऊ बहिणीला तिचे सदैव रक्षण करण्याचं वचन देतो तसंच आपल्या भावाचं देखील रक्षण करण्याचं कर्तव्य बहिणीनं पाळावं असंही त्या म्हणाल्या.

वाचा : मोदींची पाकिस्तानी बहिण, ३६ वर्षांपासून बांधते राखी

वाचा : ना दागिने, ना पैशांचा आहेर, भावाने बहिणाला भेट म्हणून दिले शौचालय

त्यांच्या या मोहिमला खूपच प्रसिद्धी लाभली आहे. विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर या सगळ्यांनीच कविता यांच्या या मोहिमेचं खूप कौतुक केलंय. ‘#Sisters4Change,’ ‘#GiftAHelmet’ हा हॅशटॅग वापरून बहिणी  आपले फोटो देखील शेअर करत आहेत.