अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी जगभरात आपली ओळख निर्माण करणाऱ्या अ‍ॅपल कंपनीने 1976 साली आपल्या पहिल्या वहिल्या कंप्युटरची किंवा संगणकाची (पर्सनल कंप्युटर) निर्मिती केली होती. त्यानंतर कंपनीने ‘अॅपल-1’ या नावाने अशा 200 कंप्युटर्सची निर्मिती केली. आनंदाची बातमी म्हणजे तंत्रज्ञान जगतातील दुर्मिळ म्हणता येईल असा ठेवा असलेल्या 200 कंप्युटर्सपैकी एखाद्या कंप्युटरवर तुम्हीही मालकी सांगू शकता. कारण अॅपल या अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान असलेल्या संगणकांचा ऑनलाइन लिलाव करणार आहे.

स्थापनेनंतर प्रथमच निर्मिती केलेल्या जवळपास 200 कंप्युटर्सचा लिलाव करण्याचं अॅपलने ठरवलं आहे. ऑनलाइन पद्धतीने हा लिलाव करण्यात येणार असून आजपासून याची सुरुवात झाली आहे. http://www.christies.com या संकेतस्थळाद्वारे लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल. 16 मे पासून 24 मे दरम्यान हा लिलाव सुरू असणार आहे.

या लिलावात चार ते साडेसहा लाख अमेरिकी डॉलर म्हणजे जवळपास 2.81 कोटी ते 4.56 कोटी रुपयांमध्ये एकेका कंप्युटरची विक्री होईल असा कंपनीला विश्वास आहे. पूर्णतः असेंबल मदरबोर्डपासून पर्सनल कंप्युटर निर्मितीची कल्पना अॅपलचे संस्थापक स्टिव्ह जॉब्स आणि स्टिव्ह वोजनियाक यांच्याकडे होती. त्यांनीच पहिल्या ‘अॅपल-1’ कंप्युटरची निर्मिती केली.

‘अॅपल-1’ सिस्टिमसोबत त्यावेळी केसिंग, पावर सप्लाय, की-बोर्ड किंवा मॉनिटर नव्हता. मात्र यासोबत प्री-असेंबल मदरबोर्ड होता, त्यामुळे हा कंप्युटर इतरांपेक्षा वेगळा ठरला. या कंप्युटरची किंमत सुरुवातीला 666.66 डॉलर एवढी ठेवण्यात आली होती, वर्ष 1977 मध्ये किंमत कमी करुन 475 डॉलर ठेवण्यात आली. 1977 च्या अखेरीस (10 जून 1977)कंपनीने अॅपल-2 या कंप्युटरची निर्मिती केली, त्यानंतर मात्र कंपनीने पहिल्या कंप्युटरच्या निर्मितीवर जास्त लक्ष दिलं नाही आणि अखेर ऑक्टोबर 1977 मध्ये जॉब्स आणि वोजनियाक यांनी ‘अॅपल-1’चं उत्पादन बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. यानंतर ज्या ग्राहकांनी अॅपल-1 ची खरेदी केली होती त्यांना ते कंप्युटर पुन्हा कंपनीला परत करण्याचा आग्रह कंपनीकडून करण्यात आला, त्यासाठी काही ऑफर्स देखील कंपनीकडून देण्यात आल्या होत्या. अॅपल-1 च्या ज्या मालकांनी आपले कंप्युटर्स कंपनीला परत केले ते नष्ट करण्यात आले, तर अर्ध्याहून अधिक कंप्युटर्स कंपनीकडे परत आलेच नाहीत.
काळाच्या ओघात अॅपलनं मोबाईलमधल्या आयफोनसह विविध क्षेत्रांमध्ये क्रांती केली असली तरी सगळ्याचा पाया अॅपल 1 हा पहिला वहिला कम्प्युटर असल्यानं या कम्प्युटर्सना संग्राह्यतेचा दर्जा असल्याचं मानण्यात येत आहे. त्यामुळेच नवीन असताना 475 डॉलरला विकले गेलेले हे संगणक आता खऱ्या अर्थी निरुपयोगी असूनही तब्बल साडे सहा लाख डॉलर्स किंवा 4.54 कोटी रुपयांना विकले जातील असा विश्वास अॅपलला असल्याचे दिसत आहे.