निसर्गात खूप काही अद्भूत, चमत्कारीक आणि तितक्याच सुंदर गोष्टी आहेत. कधी-कधी आपल्याला त्या नजरेस पडत नाहीत एवढंच. पण जेव्हा केव्हा अशा गोष्टी नजरेस पडतात तेव्हा त्याचा मनमुराद आनंद घेता आला पाहिजे नाही का! अशाच एका दुर्मिळ क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो एरव्ही क्वचितच पाहण्याचा योग कोणाच्या नशिबी आला असता. एका स्वीडिश महिलेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केलाय, ज्यात फारच क्वचितच नजरेस पडणाऱ्या एक पांढऱ्या मूसला तिनं कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय.

सध्या स्वीडनमध्ये ४ लाखांच्या आसपास मूस आहेत. हे गडद तपकिरी रंगाचे असतात. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार जगात फक्त असे शंभरच मूस आहेत ज्यांचा रंग पांढरा आहे आणि हे पांढरे मूस दिसण्याचा योग तसा दुर्मिळच. आता प्रत्यक्षात तिथे जाऊन हे प्राणी पाहण्याचा योग येईल न येईल पण तुर्तास तरी आपण व्हिडिओमध्ये त्याला पाहून या निसर्गातल्या अप्रतिम निर्मितीचा मनमुराद आनंद लुटूया तेवढंच काहीतरी वेगळं पाहण्याचं समाधान नाही का?