बिहारमधील दारूबंदीच्या काळात जेव्हा जप्त केलेली दारू गेली कुठे? असा प्रश्न इथल्या पोलिसांना विचारला होता तेव्हा ही दारू उंदरांनी ढोसली अशा थापा इथल्या पोसिलांनी मारल्या होत्या. तेव्हा त्यांच्या या थापांवर किती टीका झाल्या हे वेगळं सांगायला नको, पण आता आणखी एका चुकीचं खापर उंदरांच्या माथ्यावर फोडण्यात आलंय. इथले जलसंपदा मंत्री राजीव राजन सिंह हे या पूरासाठी उंदीरच जबाबदार असल्याचे सांगून मोकळे झालेत.

पुराचे पाणी आत शिरू नये यासाठी नदीकिनारी संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत. या तटबंदीच्या शेजारीच अनेक लोक राहतात. हे लोक इथेच आपलं धान्य देखील साठवतात. धान्यापर्यंत पोहोचण्यासाठी उंदीर भिंतीना बिळ पाडून आत शिरतात. यामुळेच पुराचं पाणी आत शिरलं असं राजीव यांचं म्हणणं आहे. त्यांच्या या उत्तरानं चांगलेच चर्चेत आलेत.  आता एखाद्या चुकीचं खापर उंदरांवर फोडण्याची ही काही बिहारमधील पहिलीच घटना नाही. गेल्यावर्षी नितीश कुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये दारूबंदी लागू केली. पोलिसांनी दारूबंदीच्या काळात जवळपास नऊ लाख लिटर दारू जप्त केली, पण जेव्हा ही दारू नेमकी गेली कुठे याचा हिशेब पोलिसांकडे मागितला गेला, तेव्हा काही दारूच्या बाटल्या नष्ट केल्या तर काही दारु इथल्या उंदरांनी फस्त केली अशा थापा इथल्या पोलिसांनी मारल्या होत्या.

बिहारमधील २० जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराच्या तडाख्यात आतापर्यंत ५००हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे कळते. तर सुमारे सात लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे. या पुराचा सर्वाधिक फटका पुर्णिया आणि चंपारन या जिल्ह्यांना बसला. लाखो लोकांची घरे पुरात वाहून गेल्याने ते बेघर झाले आहेत. यातील अनेकांच्या पुनर्वसनाची अद्याप सोय झालेली नाही. दरम्यान, ‘बिहारमध्ये पूर आलेला नाही, तर आणला गेलाय. नितीशकुमार सरकारच्या अभियंत्यांनी धरण फोडून हा पूर आणला’ असा आरोप लालू प्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर केला. त्याचबरोबर पंतप्रधानांकडून पूरस्थितीची पाहणी हा केवळ ‘ड्रामा’ असल्याची टीकाही त्यांनी केली होती.