आपण शिकून खूप मोठं व्हावं. चांगल्या पदावर काम करावं, अशी स्वप्न उराशी बाळगून धडपडणाऱ्या अनेक मुली आहेत, पण कधी कधी परिस्थितीपुढे झुकण्याची वेळ त्यांच्यावर येते. कुटुंबाची जबाबदारी की आपली स्वप्नं? असा प्रश्न समोर असताना काही मुली आपल्या स्वप्नांचे पंख छाटून जबाबदारीचा पर्याय स्वीकारतात. हिमाचल प्रदेशची पहिली टॅक्सी चालक रविना ठाकूर हिचीही कहाणी अशीच आहे. लष्करात भरती होण्याचं तिचं स्वप्न होतं, पण घरातल्या कर्त्या पुरूषाचं निधन झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आणि तिने शेवटी टॅक्सी चालवण्याचा पर्याय स्वीकारला.

डव्हच्या ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीतली कृष्णवर्णीय मॉडेल म्हणते..

हिमाचलच्या दोन हजार टॅक्सी चालकांमध्ये रविना एकमेव महिला टॅक्सी चालक आहे. २० वर्षांची रविना टॅक्सी चालवते, आपल्या कुटुंबाचं पोटही भरते आणि त्याचसोबत आपलं शिक्षणही पूर्ण करते. रविनाच्या वडिलांचं तीन वर्षांपूर्वीच निधन झालं. आवड म्हणून एकदा रविनाने वडिलांकडे टॅक्सी चालवायला शिकवण्याचा हट्ट धरला. वडिलांनी तिला टॅक्सी कशी चालवायची हे शिकवलं, पण गाडी चालवण्याच्या आवडीचं भविष्यात नाईलाजात रुपांतर होईल, याची तिने कल्पनाही केली नव्हती. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबासमोर पोटापाण्याचा मोठा प्रश्न होता. वडिलांच्या कमाईतून त्यांचं कुटुंब चालायचं. शेवटी तिच्या आईने चहाचा व्यवसाय सुरू केला. पण महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे त्यांना चहाचा ठेला बंद करावा लागला. अर्थाजनाचा तोही मार्ग बंद झाला. त्यामुळे नाईलाजाने रविनाने टॅक्सी चालवण्याचा पर्याय स्वीकारला.

होऊ दे चर्चा, ‘मोदी’ लढवताहेत सरपंचपदाची निवडणूक!

मुंबई किंवा देशाच्या इतर शहरात अनेक महिला चालक आहेत. काही महिला चालकांनी फक्त महिला प्रवाशांसाठी सेवा सुरू केली आहे. हे चित्र शहरी भागात अगदी सवयीचं झालं असलं तरी हिमाचल सारख्या ठिकाणी लोकांना ते नवं आणि तितकंच न रुचण्यासारखं होतं, त्यामुळे सहाजिक रविनाला खूप विरोधांचा सामना करावा लागला. नातेवाईकांनी देखील टोमणे मारले, पण कुटुंबाचे पोट भरायचं असेल तर लोकांचं ऐकून कसं चालेल? असा साधा प्रश्न ती विचारते. सध्या ती चंदीगढ मनाली परिसरात टॅक्सी चालवते.