आपल्या पाडसांसाठी आपल्या जिवाचं बलिदान देणारी हरिणी, दोन चित्ते या सगळ्यांच्या मागे लागलेले असताना आपल्या पिल्लांना पलून जायला मदत व्हावी यासाठी आपले प्राण देणारी माता अशी काहीशी या फोटोबाबतची कथा आपल्या सगल्यांच्या ‘स्क्रीनवर’ पडली होती. आपण सगल्यांनी हा फोटो जाम शेअर केला. एरव्ही मुलींच्या प्रोफाईल पिकवर ‘क्यूट पिक डिअर’ वगैरे कमेंट टाकणारे या  वरच्या फोटोसाठी शब्दच न फुटल्याने ते फक्त सॅड स्माईली क्लिक करून मोकळे झाले.

पण या फोटोचा पिक्चर अभी बाकी होता. आपल्यावर चारही बाजूंनी आदळणाऱ्या वाईट जोक्सकडे दुर्लक्ष करत जर थोडं आणखी सर्च करायची तसदी आपण घेतली असती तर खरं काय ते कळलं असतं.

या फोटोनंतर फोटोग्राफरला नैराश्य आल्याची माहितीपण फिरत होती. ते मात्र खरं होतं. आपल्या फोटोसोबत भलतीच स्टोरी व्हायरल झाल्याने अॅलिसन बुटिगिएग ही फोटोग्राफर दु:खाच्या खाईत ओढली गेली. आणि तिने फेसबुकवर पोस्ट टाकत सगळ्यांना समज देत मामला क्लिअर केला.

स्ट्रँगलहोल्ड नावाच्या आपल्या या फोटोविषयी सांगताना अॅलिसन म्हणाली, की ही हरिणी, तिची पाडसं वगैरे गोष्टी कुठून आल्या हे तिला समजलंच नाही. ही माहिती या फोटोसोबत नेटवर चिकटवत कोणी फेमस केली याचा अता पता नाहीये. पण आपण सगळेजण या प्रकाराला बळी पडलो हे पण खरं.

माझ्या करिअरमधल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या क्षणाचा या सगल्या अफवांनी बट्ट्याबोळ केला, असाच एकूण तिच्या या फेसबुक पोस्टचा सूर आहे. आणि खरंच आहे ते. एवढ्या सुंदर आणि बरंच काही बोलून जाणारा हा फोटो अशा वावडीमुळे प्रसिध्द होणं त्या फोटोग्राफरसाठी फारसं आनंददायी नाही.

पण मग या फोटोतलं हे हरीण काय करत होतं? ते कुठे किंवा कोणाकडे पाहत होतं? कारण या हरणाच्या डोळ्यात अनेक भावनांचा कल्लोळ दिसतोय.

‘हे हरीण भीतीने जागच्या जागी थिजलं होतं’ आपल्या खुलाशामध्ये अॅलिसनने स्पष्ट केलंय ‘दोन चित्त्यांच्या पकडीत सापडल्यावर त्या हरणाच्या सुटकेची आशाच संपली होती आणि त्याने आपल्यापुढे वाढून ठेवलेल्या नशिबाला स्वीकारायचं ठरवलं.

किती छान वाटतंय हे असं केलेलं वर्णन. ‘मृत्यू समोर दिसत असतानाच्या भावना ‘ अशा अर्थाने हा फोटो जर प्रसिध्द झाला असता तर त्याला खरा न्याय मिळाला असता. पण व्हायरलच्या जमान्यात वावरणाऱ्या आपणा सगळ्यांना हे हे कदाचित कळणार नाही