तुम्ही हेराफेरी हा चित्रपट नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटामध्ये भरपूर पैसे मिळणार म्हणून बाबुभय्या बार मालकाला, “घरावर दारुची टाकी लाव मला हवी तेव्हा नळातून दारु घेत जाईन” असं सांगतो. बाबुभय्याचा हा संवाद आजही अनेकांच्या लक्षात आहे. मात्र चित्रपटातील हा संवादामध्ये नमूद केल्याप्रमाणे खरोखरच इटलीमधील एका शहरात नळामधून चक्क वाईन आली.

‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, इटलीमधील एका गावामधील सर्व नळांना अचानक पाण्याऐवजी रेड वाइन येऊ लागली. गावातील अनेकांनी नळातून येणारी रेड वाइन मनसोक्तपणे प्यायली. तर काहींनी बाटल्या आणि मिळेल त्या भांड्यांमध्ये भरुन ठेवली. अनेकांनी नळामधून पडणाऱ्या वाईनचे व्हिडिओ शूट करुन ठेवले. मात्र हा प्रकार कशामुळे घडला याबद्दल बोलायचे झाल्यास या गावाजवळ असणाऱ्या एका वाइनरीमधील वाईन घेऊन जाणारी पाईपलाईन आहे. या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्यामधील वाईन पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या मार्गे घरांमध्ये पोहचली.

हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून सहा लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. अनेकांनी हा प्रसिद्धीसाठी जाणून बुजून केलेला प्रकार असल्याचे मत व्यक्त केलं आहे तर दुसऱ्या एका युझरने या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या परिसरातील वाईनरी कारखान्यातील अधिकाऱ्याने फेसबुकवरुन यासंदर्भात माफी मागितल्याचे समजते.