रिलायन्सच्या जिओने टेलीकॉम क्षेत्रात आल्या आल्याच चांगली पकड बसवली त्यामुळे मोठमोठ्या टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. आता एप्रिल महिन्यातच रिलायन्स आपली डिटीएच सेवा लाँच करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या दोन दिवसांपासून होत आहे. रिलायन्सची ही सेवा सुरुवातीचे ९० दिवस मोफत असणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्राहकांना तीन महिने आवडते चॅनेल मोफत पाहता येणार आहे. वेलकम ऑफर प्रमोशन अंतर्गत रिलायन्स जिओ तीन महिने ही सेवा ग्राहकांना मोफत देऊ शकतो.

रिलायन्स जिओ आता डिटीएच क्षेत्रात उतरणार म्हटल्यावर डिटीएच कंपन्यांनाही चांगलाच घाम फुटला आहे. अर्थात इतर कंपन्यांच्या डीटीएच सेवांवर याचा मोठा परिणाम होण्याची भिती कंपन्यांना आहे यातच ही डिटीएच सेवांचे टॅरिफ रेट हे १८० रुपये प्रतिमाह असल्याचे चर्चा आहे. झी न्यूजच्या माहितीनुसार रिलायन्स डीटीएच सेवांचे पॅकेजिंग प्लान हे १८० रुपयांपासून सुरू होणार आहेत.

ही ऑफर येण्याआधीच रिलायन्स जीओच्या सेटटॉप बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वेगवेगळ्या अँगलने काढलेले हे फोटो ‘कँडीटेक’ या बेवसाईटवर शेअर करण्यात आले. रिलायन्स जिओ लाईव्ह स्टिमिंगची सुविधा तसेच ३५० चॅनेल देणार असल्याचे समजते आहे. यातले ४८ चॅनेल हे एचडी असणार आहे. तसेच ‘catch up’ हे नवे फिचर देखील असणार आहे. या फिचरच्या साह्याने ग्राहक सात दिवसांपूर्वीचे कार्यक्रमही पाहू शकणार आहे. दुसरं म्हणजे फक्त आवाज कमी जास्त करण्यासाठी आणि चॅनेल बदलण्यासाठी वापरण्यात येणा-या रिमोटचे स्वरूपच रिलायन्सने बदलले आहे. हा रिमोट स्मार्ट असून वॉईस सर्च कमांडच्या साह्याने चॅनल बदलता येणार असल्याचेही वृत्त आहे.