रिलायन्स जिओच्या गिगाफायबर सेवेची अनेकांना प्रतिक्षा आहे. कंपनीने याची चाचणीही प्रमुख शहरांमध्ये सुरू केली आहे. यादरम्यान, ग्राहकांना कमर्शिअल लाँचनंतरच देण्यात येणाऱ्या सुविधा पुरवण्यात येत आहेत. यामध्ये फायबर ऑप्टीकचा वापर करण्यात आल्याने याद्वारे उत्तम इंटरनेट स्पीडही मिळणार आहे. आतापर्यंत जिओ गिगाफायबरबाबत अनेक बाबी लिक झाल्याचे समोर आले होते. परंतु याची किंमत किती असेल आणि काय प्लॅन असतील याबाबत मात्र माहिती समोर आली नव्हती. त्यातच आता प्लॅनबाबत पुन्हा एक माहिती समोर आली आहे. यानुसार गिगाफायबरचा सुरूवातीचा प्लॅन 600 रूपये प्रति महिना असणार आहे. यामध्ये युझरला 50Mbps चा स्पीड मिळणार आहे. तर प्रीव्ह्यू सब्सक्रायबर्सना 100Mbps स्पीडच्या प्लॅनसाठी महिन्याला 1 हजार रूपये मोजावे लागणार आहेत.

जिओ गिगाफायबर बाबत भारतीय ग्राहकांमध्ये मोठे आकर्षण आहे. जिओच्या भारतीय बाजारपेठेतील आगमनानंतर ग्राहकांना कमी किंमतीत इंटरनेट सेवा आणि कॉलिंग सेवा मिळण्यास सुरूवात झाली आहे. अशातच जिओची ही नवी सेवा इतर ब्रॉडबँडच्या तुलनेत स्वस्तच असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, लिक झालेल्या किंमतीबाबत जिओकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. येत्या काही दिवसांमध्ये कंपनीच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जिओने 100Mbps स्पीडची प्रिव्ह्यू ऑफर देण्यास सुरूवात केली होती. यामध्ये ग्राहकांना 4 हजार 500 रूपयांचे सिक्यॉरिटी डिपॉझिट देणे बंधनकारक होते. तसेच हे सिक्यॉरिटी डिपॉझिट ग्राहकाने कनेक्शन बंद केल्यास परत करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा देण्यात येत आहे.