Reliance JioFiber च्या युजर्ससाठी गुड न्यूज आहे. आता कंपनीकडून 199 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरवर तब्बल 1TB (1000GB) डेटा दिला जात आहे. आतापर्यंत या प्लॅनमध्ये केवळ 100GB डेटा मिळत होता. या प्लॅनच्या वैधतेमध्ये कोणताही बदल केलेला नसून अद्यापही सात दिवस इतकीच वैधता आहे. प्लॅनमध्ये झालेल्या या बदलाचा फायदा जिओ फायबरचे जे ग्राहक 699 रुपये आणि 849 रुपयांच्या बेसिक प्लॅन्सचा वापर करतात त्यांना होणार आहे, कारण या दोन्ही प्लॅनमध्ये FUP मर्यादा आहे. तर, तब्बल एक टीबी डेटा असल्यामुळे 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये डेटा संपण्याची अधिक चिंता राहणार नाही. लाँचिंगवेळी महागडे प्लॅन्स असल्यामुळे JioFiber ला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून प्लॅन्स आणि टॉप-अप व्हाउचर्समध्ये बदल केले जात आहेत.

एअरटेलसोबत स्पर्धा :
मार्केटमध्ये जिओ फायबरची टक्कर एअरटेलच्या ब्रॉडबँड प्लॅन्ससोबत आहे. एअरटेलकडून हैदराबाद सर्कलमध्ये युजर्सना 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. तर, जिओ फायबर युजर्सना 699 रुपयांच्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये एका महिन्यासाठी केवळ 150जीबी डेटा मिळतो. याशिवाय एअरटेलच्या 299 रुपयांच्या डेटा अ‍ॅड-ऑन पॅकमध्ये दर महिन्याला 3.3टीबी डेटा मिळतोय. जिओ फायबरच्या तुलनेने एअरटेलचे प्लॅन अधिक फायदेशीर असल्यामुळेच जिओ फायबरला 199 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरमध्ये 100जीबी डेटा वाढवून तब्बल 1टीबी करावा लागल्याची चर्चा आहे.

आणखी वाचा – जाणून घ्या Reliance Jio चे बेस्ट प्रीपेड प्लॅन, दररोज 3GB पर्यंत डेटा

199 रुपयांच्या प्लॅनबाबत गोंधळ : अनेक युजर्स 199 रुपयांचा प्लॅन म्हणजे सर्वात स्वस्त प्लॅन समजण्याची चूक करतात, पण हा एक टॉप-अप व्हाउचर असून केवळ मंथली रेंटल प्लॅनसोबत जोडता येतो. म्हणजे जर तुम्ही 150जीबी डेटा असलेला जिओ फाइबरचा 699 रुपयांचा प्लॅन वापरत असाल तर डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होतो. अशावेळी युजर 199 रुपयांच्या टॉप-अप व्हाउचरद्वारे हाय-स्पीड इंटरनेटची मजा घेऊ शकतात. या व्हाउचरची वैधता सात दिवस आहे.