जर तुम्ही क्रिकेट विश्वचषक 2019 पहात असाल तर व्हायरल झालेल्या एका संतापलेल्या क्रिकेट चाहत्याचा फोटो तुम्हाला आठवत नसेल याची शक्यता कमीच. विश्वचषकातील भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला आणि या क्रिकेट चाहत्याच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरूवात केली. तेव्हापासून एखादा झेल सुटल्यावर, आवडता खेळाडू लवकर बाद झाल्यास, स्वैर गोलंदाजी केल्यास किंवा अगदी पंचांनी दिलेल्या खराब निर्णयांसाठीही या चाहत्याच्या फोटोचा आवर्जून वापर केला जात आहे.

केवळ क्रिकेटपर्यंत या चाहत्याचा व्हायरल फोटो मर्यादित राहिलेला नाही तर जवळपास सर्वच क्षेत्रात अगदी राजकारणातही एखाद्याला ट्रोल करण्यासाठी हा फोटो विविध कॅप्शन वापरुन व्हायरल केला जात आहे. अर्थात एखाद्या गोष्टीचा अपेक्षित निकाल न लागल्यास चाहते हा फोटो व्हायरल करतायेत. यामुळे हा चाहता इतका प्रसिद्धीच्या झोतात आलाय की आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्ड कप या अधिकृत ट्विटर हँडलने देखील याची दखल घेतली आहे.

कसा झाला व्हायरल –

सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या एका क्षेत्ररक्षकाने सोपा झेल सोडला, त्यानंतर हताश झालेल्या या चाहत्याने कंबरेवर दोन्ही हात ठेवून आपल्या हावभावाद्वारे नाराजी व्यक्त केली होती. त्याचवेळी टीव्ही कॅमेरामनने त्यांचे हावभाव टिपले आणि लोकांना ते इतके आवडले की त्यांनी लागलीच स्क्रीनशॉट काढून व्हायरल करायला सुरूवात केली.

कोण आहे हा चाहता – 

दरम्यान, हा क्रिकेट चाहता नेमका कोणत्या देशाचा आहे याबाबत अनेकांना प्रश्न पडलाय. क्रिकेट वर्ल्ड कप या अधिकृत हँडलवरुन केलेल्या ट्विटनुसार मोहम्मद सरीम अख्तर (Muhammad Sarim Akhtar)असं या चाहत्याचं नाव असून तो मूळ पाकिस्तानी आहे व लंडनमध्ये वास्तव्यास आहे. हा चाहता इतका प्रसीद्ध झालाय की आता पाकिस्तानी चाहत्यांनी त्याच्या फोटोचा वापर चक्क टी-शर्टवर करायला सुरूवात केली आहे. पाकिस्तान-न्यूझीलंड दरम्यान झालेल्या सामन्यात काही पाकिस्तानी चाहते हे टी-शर्ट घालून संघाला पाठिंबा देताना दिसले. क्रिकेट वर्ल्ड कपने या चाहत्यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून मोहम्मद सरीम अख्तर याला टॅग केलं आहे. वर्ल्ड कप बघताना आमच्या मनात ज्या काही भावना व्यक्त होतात त्या सर्व भावनांसाठी या फोटोवरील हावभाव अतिशय योग्य वाटले, म्हणून टी-शर्टवर तो फोटो वापरण्याचं ठरवलं असं या पाकिस्तानी चाहत्यांनी सांगितलं.

पहा व्हिडिओ –