पंजाबच्या अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणीचं नशीब चांगलंच फळफळलं असून ही महिला रातोरात कोट्यधीश बनली आहे. रेणू चौहान असं महिलेचं नाव आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रेणू यांनी फक्त १०० रुपयांचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं. त्या तिकीटावर रेणू चौहान एक कोटी रुपयांचं बक्षिस जिंकल्यात. गुरूवारी रेणू चौहान यांनी पंजाब राज्य लॉटरी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लॉटरी तिकीट आणि आवश्यक कागदपत्रे जमा केल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली.

मध्यमवर्गीय कुटुंबातील रेणू चौहान यांच्या पतीचं कपड्यांचं दुकान आहे. “माझ्या पतीचं कपड्यांचं दुकान आहे, या पैशांमुळे आता आमच्या कुटुंबाला सुखी जीवन जगण्यात मदत होईल”, असं रेणू म्हणाल्या.

पंजाब राज्य लॉटरी विभागाच्या प्रवक्त्यांनी याबाबत सांगितलं की, “पंजाब स्टेट डिअर 100 लॉटरीचा ड्रॉ 11 फेब्रुवारी 2021 रोजी जारी झाला आणि पहिलं बक्षिस तिकीट नंबर डी-12228 ला मिळालं”. हेच तिकीट रेणू चौहान यांनी १०० रुपयांत खरेदी केलं होतं.

“लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी रेणू चौहान यांनी कागदपत्रे जमा केली असून लवकरच त्यांच्या खात्यात विजयाची रक्कम जमा केली जाईलठ, असं पंजाब राज्य लॉटरी विभागाच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. या लॉटरीमुळे रेणू चौहान यांच्या जीवनाला एक सुखद कलाटणी नक्कीच मिळाली आहे.