जगभरात पसरलेल्या करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर अनेक प्रकारे कलात्मकरित्या जनजागृती केली जात आहे. तामिळनाडूतील  एका रेस्तराँने देखील आपल्या आगळ्यावेगळ्या ‘मास्क पराठा’ या डिशद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हा पराठा इथल्या खवय्यांमध्ये भलताच प्रसिद्धही झाला आहे.

या रेस्तराँनं बनवलेल्या पराठ्याचा आकार एकदम भन्नाट आहे. सध्या करोनापासून सुरक्षेसाठी मास्क लावणे बंधनकारक आहे. याचे महत्व या पराठ्याद्वारे सांगण्यात आले आहे. कारण, हा पराठाच मास्कच्या आकारात बनवण्यात आला आहे. अशा या विशेष अभियानाद्वारे मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे तसेच फिजिकल डिस्टंसिंगचा नियम पाळणे याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यापूर्वी देखील अशा प्रकारे काही रेस्तराँने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आगळ्यावेगळ्या पद्धतीने पदार्थ तयार केले आहेत. हे पदार्थ इंटरनेटवर चांगलेच व्हायरलही झाले होते. मार्च महिन्यांत व्हिएतनाममधील एका रेस्तराँमधील शेफ होयांग तुंग यांनी करोना विषाणूच्या आकाराचा बर्गर बनवला होता. याद्वारे होयांग यांनी जगभरातील लोकांमध्ये करोनाची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

काही दिवसांपूर्वी कोलकात्यातील एका मिठाईच्या दुकानात दोन विशिष्ट मिठाया तयार केल्या गेल्या होत्या. त्यांची नावं ‘करोना संदेश’ आणि ‘करोना केक’ अशी होती. करोना विषाणूबाबत जनजागृतीसाठी या मिठाया बनवण्यात आल्या होत्या. मात्र, हा करोना केक ग्राहकांना विकत नव्हे तर मोफत वाटप करण्यात येत होता. कारण, करोनाबाबत जनजागृती करणे हे आपलं सामाजिक कर्तव्य असल्याचं या दुकानाच्या मालकाचं म्हणणं आहे. त्याचबरोबर एका फास्ट फूडच्या दुकानात करोनाच्या आकाराची भजी देखील तयार करण्यात आली होती.

याचप्रकारे तामिळनाडूतील मदुराई येथे असलेल्या ‘टेम्पल सिटी’ नामक रेस्तराँने करोनाच्या जनजागृतीसाठी मास्कच्या आकाराचा पराठा तयार केला आहे. टेम्पल सिटी हे मदुराईमधील मोठं साखळी रेस्तराँ आहे. या रेस्तराँमधील के. एल. कुमार या शेफने हा युनिक मास्क पराठा तयार केला आहे.