News Flash

मगरीच्या गळ्यात अडकलेला टायर काढणाऱ्याला मिळणार बक्षीस, जाणून घ्या काय आहे प्रकरण

काढता येईल का १३ फूट लांब बिचाऱ्या मगरीच्या गळ्यातून टायर?

गेल्या काही वर्षांपासून एका मगरीच्या गळ्यामध्ये एक टायर अडकलाय. या टायरमुळे त्या मगरीला योग्यरित्या खाता-पिताही येत नाही, की सामान्य आयुष्यही जगता येत नाहीये. ही घटना आहे इंडोनेशियातली.

आता इंडोनेशियाच्या मध्य सुलावेसी प्रांत प्रशासनाने या मगरीचा जीव वाचवण्यासाठी तिच्या गळ्यातून टायर काढणाऱ्या व्यक्तीसाठी बक्षिसाची घोषणा केली आहे. इंडोनेशियाची सरकारी वृत्तसंस्था Antara ने दिलेल्या वृत्तानुसार ही मगर 2016 पासून गळ्यात टायर अडकलेल्या अवस्थेत फिरतेय.

एका बाइकचा टायर गळ्यात अडकलेली ही मगर सर्वप्रथम 2016 मध्ये पहिल्यांदा पालू नदीत दिसली होती. 13 फूट म्हणजे जवळपास 4 मीटर लांब या खतरनाक मगरीच्या गळ्यातून टायर काढणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखेच आहे. यापूर्वी इंडोनेशियाच्या स्थानिकांनी कधी टायर काढण्याचा प्रयत्न केलाच नाही, असं अजिबात नाहीये. त्यांनी अनेकदा प्रयत्न केले पण यश मिळाले नाही. ही मगर 2018 मध्ये झालेल्या भूकंप आणि त्सुनामीतूनही वाचली पण विशेष म्हणजे त्यावेळीही टायर काही तिच्या गळ्यातून निघाला नाही.

या मगरीचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतात. ते पाहून पशूप्रेमी दुःख व्यक्त करतात आणि स्थानिक अधिकाऱ्यांना सुनावतात. त्या टायरमुळे मगरीचा हळूहळू मृत्यू होतोय हिच सर्वांची चिंता आहे. तो टायर मगरीच्या गळ्यात कसा गेला हे कोणालाच माहिती नाही, पण त्या मगरीला कोणीतरी पाळण्याचा प्रयत्न केला होता, असं म्हटलं जातं. ती व्यक्ती मगरीचं पालन करु शकली नाही म्हणून गळ्यात टायर अडकवून सोडून दिलं असं सांगितलं जातं. यापूर्वी अधिकाऱ्यांनी तिच्या गळ्यातून टायर काढण्याचा प्रयत्न केला होता पण ते अयशस्वी ठरले. 2018 मध्ये पशूतज्ज्ञ मोहम्मद पंजी यांनी मगरीची सूटका करण्याचा प्रय़त्न केला होता. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने मांस खाऊ घालण्याच्या बहाण्याने टायर काढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनाही अपयश आलं. मात्र, यावेळेस अधिकारी एखाद्या एक्स्पर्ट व्यक्तीकडून हे काम करुन घेऊ इच्छितात. ‘बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे, पण हे काम सामान्य जनतेने करण्याचं काम नाहीये. ज्यांच्याकडे योग्य अनुभव असेल तेच हे काम करु शकतात. मगरीच्या जवळ जाऊ नका आणि तिला त्रास देऊ नका असं आवाहन जनतेला करण्यात आलं आहे. हे काम एक्स्पर्ट लोकांचं आहे आणि तेच हे करतील’, असं तेथील अधिकाऱ्यांनी सांगितलं.

“जर अधिक कालावधीसाठी टायर मगरीच्या गळ्यातच अडकून राहिला तर तिचा मृत्यू होऊ शकतो. यासाठी आम्ही तिची सूटका करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केलीये. जो व्यक्ती मगरीच्या गळ्यातून टायर काढेल, त्याला बक्षीस दिले जाईल”, अशी घोषणा मध्य सुलावेसी प्रांताच्या Natural Resources Conservation च्या कार्यालयाकडून करण्यात आली आहे. मात्र, बक्षीस म्हणून किती पैसे दिले जातील याचा खुलासा करण्यात आलेला नाही. तरी आता या बिचाऱ्या मगरीच्या गळ्यातून टायर काढला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:01 pm

Web Title: reward announcement for removing tyre which is stucked in crocodiles neck for years sas 89
Next Stories
1 ‘या’ फोटोमध्ये लपलेला सरडा शोधून दाखवण्याचं Challenge स्वीकारता का?
2 महाराष्ट्रात मी फिरायला कुठे जाऊ शकतो?? अजिंक्य रहाणेला हवी आहे तुमची मदत
3 कृपा करा, प्रशिक्षकासाठी अर्ज करु नका ! जसप्रीत बुमराहला सल्ला देणारे संजय मांजरेकर ट्रोल