चांगल्या शिक्षणासाठी सगळेच प्रयत्न करतात. आपल्याला चांगले मार्क्स मिळावेत, आपलीही चर्चा व्हावी, आपलं करिअर आणि भविष्य उज्वल व्हावं यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रयत्न चालू असतात. अभ्यासात त्या विद्यार्थ्यांची स्वत:ची मेहनत असतेच. पण त्याच्या घरातलं वातावरणाचाही त्या विद्यार्थ्याच्या यशापयशामध्ये मोठा वाटा असतो. घरामध्ये अभ्यासाला पूरक वातावरण असेल तर त्याचा विद्यार्थ्याला फायदा होतो. पण बेताची परिस्थिती असणाऱ्या घरांमध्ये विद्यार्थ्यांना अनेक कठीण परिस्थितींना तोंड द्यावं लागतं.

एका रिक्षावाल्याच्या मुलाने एम. ए. मध्ये गोल्ड मेडल पटकावत मेहनतीने कुठल्याही परिस्थितीतून माणूस मार्ग काढू शकतो हे दाखवून दिलंय. त्याहीपेक्षा मोठी बाब म्हणजे मुस्लिम कुटुंबातल्या या मुलाचं सुरूवातीला कन्नड भाषेवर प्रभुत्त्व नसूनही मेहनतीने त्याने आपली भाषा सुधारत हे यश कमावलंय.

भेटा मुस्तफाला. रिक्षाचालकाच्या पोटी जन्माला आलेल्या मुस्तफाने मंगळूर युनिव्हर्सिटीमध्ये एम.ए. कन्नडमध्ये पहिला नंबर मिळवत गोल्ड मेडल पटकावलंय. आपलं हे यश त्याने त्याच्या वडिलांना अर्पण केलंय. आणि यापुढेही जात या गोल्ड मेडलसोबत मिळालेली रोख बक्षिसंही त्याच्या वडिलांना दिली आहेत.

कर्नाटकमधल्या कोडागू जिल्ह्यात राहणाऱ्या मुस्तफाने कन्नडमध्ये पदवी घेतल्यावर त्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी त्याने मंगळूर युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. जिद्दीने एम.ए. पूर्ण करून आणि सुवर्णपदक मिळवून त्याने त्याच्या वडिलांच्या कष्टाचं चीज केलं आहे.

वाचा- ७ महिन्यांची गरोदर असतानाही ती ३ दिवस राबली!

चौघा जणांच्या कुटुंबाला पोसण्यासाठी मुस्तफाच्या वडिलांनी रिक्षा चालवत पैसे जोडले. या कठीण परिस्थितीला मुस्तफाने त्याच्या अभ्यासात अडथळा बनू दिलं नाही.

पण याहीपेक्षा मोठा प्रश्न होता तो भाषेचा. कर्नाटकमध्ये राहत असला तरी मुस्तफाचं कुटुंब मुस्लिम असल्याने त्यांच्या समाजात जास्तकरून हिंदी किंवा उर्दू बोलली जाते. कन्नडवर म्हणूनच मुस्तफाचं म्हणावं तेवढं प्रभुत्त्व नव्हतं. अशा पार्श्वभूमीवर त्याने मिळवलेलं यश आणखी उल्लेखनीय ठरतं.

VIDEO: बाळाची झोपमोड टाळण्यासाठी आईची कसरत!

कन्नड भाषेत प्रावीण्य मिळवण्यासाठी त्याला अपार मेहनत घ्यावी लागली. यासाठी त्याने थेट कन्नड साहित्याचा आधार घेतला. पूर्णचंद्र, तेजस्वी अशा कन्नड लेखकांचं साहित्य मुस्तफाने पालथं घातलं.

स्वकष्टाने हे यश मिळवलेल्या मुस्तफाला आता कन्नड भाषेचा प्राध्यापक व्हायचं आहे!