विश्वचषकातील साखळी सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केल्यानंतर सोशल मीडियामध्ये सामनावीर रोहित शर्माने मारलेल्या एका षटकाराची प्रचंड चर्चा रंगली. या सामन्यात रोहितने 113 चेंडूंमध्ये 140 धावांची तडाखेबाज खेळी केली. पण, पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अलीला मारलेल्या एका षटकाराने रोहितने भारतीय क्रिकेटप्रेमींची मनं जिंकली.

73 बॉलमध्ये 85 धावांवर खेळत असताना रोहितने पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अली याला अप्पर कटद्वारे थर्ड मॅनच्या दीशेने उत्तुंग षटकार लगावला. 2003 वर्ल्ड कपमध्ये सचिन तेंडुलकरने शोएब अख्तरलाही अशाच पद्धतीने अपर कटद्वारे सिक्स मारला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये केवळ इतकाच फरक ठरला की सचिन त्या सामन्यात 98 धावांवर बाद झाला होता, पण रोहितने मात्र आपले शतक पूर्ण केले. याच मॅचमध्ये विरेंद्र सेहवागनेही अशाच पद्धतीने षटकार लगावला होता.

रोहितने तो षटकार लगावल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर दोन्ही षटकरांमध्ये साम्य असल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर सचिनने मारलेला षटकार चांगला की रोहितने मारलेला अशी चर्चा रंगली आहे. सचिनने मारलेल्या षटकारात शोएब अख्तरच्या वेगाचाही समावेश होता त्यामुळे तो षटकार खेचणं सोपं होतं आमि रोहितला अलीने टाकलेला चेंडू तुलनेने हळू होता त्यामुळे रोहितला षटकारासाटी स्वतःची ताकद देखील लावायला लागली असा तर्क रोहितच्या चाहत्यांकडून मांडला जात आहे. तर सचिनने मारलेला सिक्स रावळपिंडी एक्स्प्रेसला होता, तसंच त्याने धावांचा पाठलाग करताना दबावात षटकार ठोकला. दुसरीकडे रोहितने मारलेला षटकार रावळपिंडी एक्स्प्रेस नव्हे तर पंजाब पॅसेंजर ट्रेनला मारला अशी खिल्ली सचिनचे समर्थक उडवत आहेत. दोघांपैकी कोणाचा षटकार चांगला होता याबाबत चाहत्यांमध्ये वाद सुरू असताना आता यावर खुद्द सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.


सोशल मीडियावर त्या षटकाराबाबत रंगलेली चर्चा पाहून आयसीसीने दोन्ही षटकारांचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर केले आणि क्रिकेटप्रेमींना दोघांपैकी कोणी चांगल्याप्रकारे षटकार खेचला असा प्रश्न विचारला होता. त्यावर स्वतः सचिनननेच प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही दोघंही भारतीय आहोत आणि तसंच सांगायचं झालं तर आम्ही दोघंही आमच्या मुंबईचे आहोत’. असं उत्तर सचिनने आयसीसीच्या ट्विटवर दिलं आहे. एकप्रकारे सचिनने रोहितद्वारे मारलेल्या त्या हुबेहुब षटकारामागे मुंबई कनेक्शन असल्याचं म्हटलंय.


तर, सचिनच्या ट्विटवर थोड्याचवेळात रोहित शर्मानेही ‘स्पॉट ऑन’ असा रिप्लाय दिला असून अप्रत्यक्षपणे सचिनशी आपण सहमत असल्याचं म्हटलंय.