World Oceans Day : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत असून वैद्यकीय सहकार्यामुळे अनेक लोक करोनामुक्त झाले आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत विविध ठिकाणी हळूहळू लॉकडाउनच्या अटी शिथील करून लोकांना घराबाहेर जाण्याची सशर्त मुभा देण्यात आली आहे. पण क्रिकेटचा हंगाम अद्याप सुरू न झाल्याने क्रिकेटपटू घरातच आहेत. घरबसल्या अनेक क्रिकेटपटू सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. सध्या टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत.

भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा मात्र असं काही करत नसून त्याने World Oceans Day च्या निमित्ताने एक खास संदेश आपल्या चाहत्यांना दिला आहे. “तुम्हाला सगळ्यांना world ocean day च्या शुभेच्छा. आपण सारे मिळून महासागर आणि त्यातील जीवांचे रक्षण करूया, महासागरातील पाणी स्वच्छ आणि निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करूया”, असे ट्विट करत त्याने महत्त्वाचा संदेश दिला आहे.

रोहितने या आधीही करोनाशी लढा देणाऱ्या प्रत्येक देशवासीयांसाठी पर्यावरणाशी संबंधित एक छानसा संदेश दिला होता. रोहितने ट्विटच्या माध्यमातून करोना दरम्यान सकारात्मक गोष्टीकडे साऱ्यांचे लक्ष वेधले होते. “हा विषाणू आपल्या साऱ्यांच्या जीवनात एका वादळासारखा आला आहे. ज्या गोष्टींना आपण सामान्य म्हणू शकतो, अशा साऱ्या गोष्टी या विषाणूने उद्ध्वस्त केल्या आहेत. पण जर या साऱ्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहिले, तर (लॉकडाउन काळात सारं काही बंद असल्याने) धरणीमाता सध्या स्वत:चे स्वास्थ्य सुधारते आहे. या अवघड आणि कसोटीच्या काळात धरणीमाता आपल्या साऱ्यांनादेखील आशेचा किरण शोधण्यास प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे आपण देखील सकारात्मक विचार करूया”, असा संदेश रोहितने दिला होता.