ईशान्य भारतीय नागरिकांविरुद्ध होणारे गुन्हे आणि त्यांना सहन करावा लागणारा वंशवाद कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र अनेक अडचणींना तोंड देत तिथेल युवक आपआपल्या क्षेत्रात प्रगती करत आहेत. अशीच मणिपूरवासीयांना अभिमान वाटेल अशी बातमी आहे. मणिपूरमधील आदिवसी जमात असणाऱ्या नागा आदिवसी परिवारात जन्मलेल्या रोवीईनाई पाऊमाईने वैमानिक होत चक्क आकाशाला गवसणी घातली आहे.

परंपरागत चालत आलेली पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या नागा कुटुंबातील मुलीने इतकी मोठी आकाशझेप घेतल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. विमान उडवण्याचे लायसन्स मिळवणारी रोवीईनाई मणिपूरमधील पहिली महिला ठरली आहे. नुकताच तिने ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समधील बॅशिअर एव्हिएशन कॉलेजमधील वैमानिक होण्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला. विशेष म्हणजे तिला लगेच नोकरीही मिळालीय आणि तीसुद्धा थेट जेट एअरवेजसारख्या नामांकित कंपनीमध्ये. त्यामुळे तिच्यावर ट्विपल्स भलतेच इम्प्रेस झाले असून अनेकांनी तिचा पायलटच्या पोषाखातील फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसापूर्वीच काश्मीरमधील आयशा इझीज या २१ वर्षीय तरुणीने सर्वात लहान वयात वैमानिक होण्याचा पराक्रम केला होता. आयशाला वयाच्या १६ व्या वर्षीच बॉम्बे फ्लाईंग क्लबकडून विमान उडवण्याचा शिकाऊ परवाना देण्यात आला होता. आयशाशिवाय आंध्रप्रदेशमधील अॅनी दिव्या हीने ३० व्या वर्षी जगातील सर्वात मोठ्या विमानांपैकी एक असणारे बोईंग ७७७ विमान उडवले. इतके मोठे विमान उडवणारी ती जगातली सर्वात लहान महिला वैमानिक ठरलीय. तिने एअर इंडियामध्ये काही वर्षे नोकरी केल्यानंतर स्पेनमध्ये बोईंग ७३७ उडवले होते. त्याच अनुभवाच्या जोरावर तिने बोईंग ७७७ही उडवले.