ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्याबद्दल प्रत्येकालाच कुतूहल आहे. कुतूहल असणंही साहाजिकच आहे म्हणा, दीर्घकाळ राजगादीवर असलेली ती ब्रिटिश राजघराण्यातली पहिली व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी, सवयी जाणून घेण्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. राणीचे अनेक फोटो तुम्ही कधीना कधी पाहिले असतील. या फोटोंमध्ये एक गोष्ट तुमच्या पटकन लक्षात आली असेल ती म्हणजे राणी जिथे जिथे जाईल तिथे तिच्या हातात एक छोटीशी पर्स असते. तुम्ही म्हणाल यात काय वेगळं? सगळ्याच महिलांच्या हातात किंवा खांद्यावर पर्स असतेच, तेव्हा राणीने जर पर्स सोबत घेतली तर त्यात काय नवल. पण सोबत सतत पर्स बाळगण्यात राणीचे एक गुपित दडलं आहे. ही पर्स काही दिखावा किंवा पैसे ठेवण्यासाठी राणी सोबत बाळगत नाही तर तिच्या सहका-यांना सूचना देण्यासाठी ही बॅग तिच्या सोबत असते.

एका इतिहासकाराने दिलेल्या माहितीनुसार राणी आपल्या सहकाऱ्यांना सूचना देण्यासाठी बॅग सोबत ठेवते. यामागे काही सिक्रेट साईन्स म्हणजेच इशारे असतात, या इशाऱ्यांचा अर्थ सहकाऱ्यांनी समजून लगेच तसा प्रतिसाद देणे अपेक्षित असतं. म्हणजे राणीला आता आपले संभाषण आवरतं घ्यायचं आहे किंवा तिला पुढच्या काही मिनिटांत त्या ठिकाणावरून निघायचे आहे असे अनेक इशारे आपल्या पर्सचा वापर करून राणी देत असते. समजा राणीने आपल्या एका हातातली पर्स दुसऱ्या बाजूला घेतली तर तिला संभाषण थांबवायचे आहे असा अर्थ होतो. जर राणीने आपली बॅग टेबलवर ठेवली तर काही मिनिटांत ती तिथून निघणार आहे असा अर्थ होतो. राणीच्या पर्समध्ये फक्त एक फाऊंटन पेन, रुमाल आणि मिंट एवढ्याच वस्तू असतात. रविवारी चर्चमध्ये जाताना राणीच्या पर्समध्ये फक्त पैसे असतात. आश्चर्य म्हणजे फार फार तर राणी ५ किंवा १० पाउंड म्हणजे साधरण ४०० ते ८०० रुपये सोबत ठेवते, कारण चर्चला राणीने दान देण्याची पद्धत आहे.

हे झालं राणीच्या पर्सबाबत पण असेही काही नियम आहेत जे या राजघराण्याच्या सत्ताधीशांनाही पाळावेच लागतात. याला राणीही अपवाद नाही. पाहुयात असे काही नियम.
– राजघराण्यातल्या व्यक्तींना मतदानात भाग घेता येत नाही.
राजघराण्यातल्या व्यक्तींना इंग्लंडमधल्या कोणत्याही निवडणुकांमध्ये मतदान करता येत नाही. राणीने किंवा राजघराण्यातल्या एका व्यक्तीने एका विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा देणं अपेक्षित नसतं. जर त्यांनी असं केलं तर अनेक लोक या घरण्याचं अनुकरण करतील आणि लोकशाहीला ते मारक ठरेल. यामुळे राजघराण्याच्या सदस्यांना मतदान करता येत नाही. नुकत्याच झालेल्या ब्रिटनमधल्या पुरस्काराच्यावेळी केट मिडलटन काळ्या रंगाची वस्त्रे परिधान न करता आल्या होत्या त्यावेळी त्यांच्यावर मोठी टिका झाली होती. पण, राजघराण्यातील नियमानुसार त्या प्रत्यक्ष कोणत्याही चळवळीला पाठिंबा देऊ शकत नव्हत्या.

– त्यांची कुठल्याही सरकारी पदावर नेमणूक होऊ शकत नाही.
इंग्लंडमध्ये शेकडो वर्षांपूर्वी लोकशाहीची स्थापना झाली त्यावेळी राजघराण्याच्या निरंकुश आणि सर्वव्यापी अशा सत्तेला सुरूंग लावणे हा एक प्रमुख हेतू होता. गेली अनेक शतकं इंग्लंडच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनातला राजघराण्याचा हस्तक्षेप टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. आधीच प्रभावशाली असलेल्या राजघराण्यातल्या व्यक्तींना लोकशाही व्यवस्थेमधले कुठलेही अधिकार मिळू नयेत यासाठी राजघराण्यातल्या सदस्यांना कोणत्याही सरकारी पदावर घेतलं जात नाही.

– कोणीही दिलेली भेटवस्तू त्यांना अगदी अगत्याने स्वीकारावीच लागते
राजघराण्यातल्या कुठल्याही व्यक्तीला दिलेली भेटवस्तू ही ब्रिटनच्या सिंहासनाला दिलेली भेट असते. त्यामुळे ती त्यांना स्वीकारावीच लागते. मुंबईतल्या डबेवाल्यांनी प्रिन्स चार्ल्सना भेट म्हणून दिलेली गांधीटोपी त्यांनी प्रेमाने स्वीकारली होती.

– राजघराण्यातल्या भोजनावेळी इंग्लंडच्या राणीने भोजन थांबवल्यावर बाकी सगळ्यांना जेवण थांबवावंच लागतं. ब्रिटनच्या राणीसोबत एकाच टेबलावर भोजन करायचा सन्मान मिळालेल्या सगळ्यांना अगदी कडक नियम पाळावे लागतात. राणीने आपलं जेवण संपवलं की त्या टेबलवर बाकी सगळ्यांना आपापलं जेवण थांबवावंच लागतं.

– राजघराण्यातल्या व्यक्तींना ‘शेलफिश’ खायला मनाई आहे. हा विचित्र नियम अनेत शतकांपू्र्वी बनवला गेला होता आणि याचं नेमकं कारण स्पष्ट नाही.

– इंग्लंडच्या ‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये कमीत कमी सात डोमकावळे ठेवावेच लागतात. ही विचित्र परंपराही कधी सुरू झाली हे माहीत नाही. पण लंडन मधल्या डोमकावळ्यांची संख्या सातपेक्षा कमी झाली तर इंग्लंडचा राज्यकारभार कोसळतो असा राजघराण्यामध्ये समज आहे. ‘टॉवर ऑफ लंडन’मधल्या डोमकावळ्यांची काळजी घ्यायला स्पेशल स्टाफ तैनात असतो आणि त्यांची संख्या सातपेक्षा कमी कधीच होऊ दिली जात नाही.मध्ययुगीन कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये डोमकावळ्यांचा उपयोग संदेशवहनासाठी केला जायचा. आपत्कालीन स्थितीत राजघराण्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटू नये म्हणून खबरदारीसाठी हा नियम बनवला गेला असावा.