संपूर्ण जगाचं ज्या शाही विवाहसोहळ्याकडे लक्ष लागून राहिलं होतं, तो विवाहसोहळा काल पार पडला. ब्रिटनच्या राजघराण्याचे धाकटे युवराज हॅरी आणि अभिनेत्री मेगन मार्कल यांच्या ‘रॉयल अफेअर’ला एक नवी ओळख मिळाली. सेंट जॉर्ज चॅपल इथं मोठ्या थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्यातील प्रत्येक गोष्ट खास होती, अगदी वेडिंग केकपासून ते मेगनच्या वेडिंग गाऊनपर्यंत. तर जाणून घेऊयात मेगनच्या वेडिंग ड्रेसबद्दल १० रंजक गोष्टी..

१. हा शुभ्र पांढऱ्या रंगाचा, बोट नेक गाऊन ब्रिटीश डिझायनर क्लेअर वेट केलरनं डिझाइन केलं होतं. ‘जिवॉन्शी’ Givenchy या प्रसिद्ध फ्रेंच फॅशन हाऊसची ती संचालक आहे.

२. या गाऊनची किंमत साधारणपणे २.५ कोटी रुपये इतकी आहे.

३. या गाऊनमागील ट्रेल पाच मीटर लांबीचा होता.

४. त्या ट्रेलवर विविध फुलांचं बारिक नक्षीकाम करण्यात आलं होतं.

५. कॉमनवेल्थच्या ५३ देशांच्या फुलांचं हे नक्षीकाम होतं.

६. प्रिन्स हॅरी आणि मेगनच्या कामाच्या भागात या ५३ देशांचा विशेष सहभाग असल्याने तिने ट्रेलवर त्या देशांतील महत्त्वाच्या फुलांचं नक्षीकाम करण्यास सुचवलं होतं.

७. या फुलांच्या नक्षीकामात मेगननं तिच्या दोन आवडत्या फुलांचाही समावेश करण्यास सांगितलं होतं. यामध्ये केन्सिंग्टन पॅलेसमधील विंटरस्वीट आणि कॅलिफोर्निया पॉपी या दोन फुलांचा समावेश आहे.

८. कॅलिफोर्नियामध्ये मेगनचा जन्म झाला म्हणून तिथलं कॅलिफोर्निया पॉपी हे फूल आणि लग्नानंतर केन्सिंग्टन पॅलेसमध्ये राहणार असल्याने तिथलं विंटरस्वीट हे फूल तिने निवडलं.

९. रेशीम आणि पारदर्शक कापडाच्या ट्रेलवर हाताने नक्षीकाम करण्यात आलं होतं. हा ट्रेल बनवणारे कारागीर दर ३० मिनिटांनी त्यांचे हात स्वच्छ धूत असल्याची विशेष काळजीही घेण्यात आली होती.

१०. ५३ देशांच्या फुलांविषयी डिझायनरने बराच वेळ घेऊन माहिती काढली आणि त्यातील प्रत्येक फूल अनोखं असणार याचीही तिनं बारकाईनं काळजी घेतली.