‘करावे तसे भरावे’ अशी मराठीमध्ये म्हण आहे. कोलंबियामधील एका धावपटूबरोबरच असंच काहीतरी झालं. या धावपटूने धावताना एका कुत्र्याला लाथ मारली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या खेळाडूला स्पॉन्सरशीप देणाऱ्या बूट कंपनीने त्याची स्पॉन्सरशीपमागे घेतली आहे.

कोलंबियामध्ये कॅल्डासमधील नियरा शहरामधील सॅण्ट सिलवेस्टर रोड रेसमध्ये जॅमी अ‍ॅलिजानार्डोने याने भाग घेतला होता. याच स्पर्धेदरम्यान धावपटूंचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जॅमी आणि इतर धावपटू धावाताना दिसत आहे. या धावपटूंसोबत एक कुत्राही रस्त्याच्या बाजूने धावताना दिसत आहे. एका वळणाजवळ धावपटू वळत असताना कुत्राही रस्ता ओलांडून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचवेळी जॅमी या कुत्र्याला जोरात लाथ मारतो. ही लाथ इतक्या जोरात मारतो की कुत्रा खाली पडतो. कुत्र्याच्या वेदना बघूनही जॅमी तसाच धावत पुढे निघून जातो. कुत्राही पुन्हा उठून धावू लागतो. हाच व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जॅमीवर टीकेची झोड उठवली.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जॅमीने एक पत्रक जारी करुन घडलेल्या प्रकरणाबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. “मी केलेल्या कृत्याचे मी कोणत्याही प्रकारे समर्थन करु इच्छित नाही. मी घडलेल्या घटनेची परफेड करण्यासाठी रस्त्यांवरील कुत्र्यांसाठी नक्कीच काहीतरी विधेयक कार्य करेन. मी त्याबद्दल सोशल मिडियावर पोस्ट करणार नाही पण मी नक्कीच काहीतरी करेन. धावण्याच्या नादात माझ्याकडून तो प्रकार घडला तो निंदनीयच आहे,” असं जॅमीने या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

मात्र जॅमीने माफी मागितल्यानंतरही त्याला स्पॉन्सरशीप देणारी अमेरिकेतील स्पोर्ट्सवेअर कंपनी अंडर आरमोर हीने आपली स्पॉन्सरशीप मागे घेत असल्याचं पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. “मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे आम्ही जॅमी अ‍ॅलिजानार्डोसोबत असलेले सर्व संबंध तोड आहोत. प्राण्यांच्या जीवाला धोका पोहचवणाऱ्या कोणत्याही कृतीचे आमच्या कंपनीकडून समर्थन केले जाणार नाही,” असं कंपनीने पत्रकामध्ये म्हटलं आहे.