करोनामुळे मरण पावणाऱ्यांची आकडेवारी रशियाकडून लपवली जात असल्याचा खळबळजनक दावा रशियामधील एका माजी मॉडेलनं केला आहे. या मॉडेलच्या वडिलांचा मृत्यू करोनामुळे झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर शवागारामध्ये गेलेल्या या मॉडेलला तिथे अनेक मृतदेह दिसले. मात्र ज्या समारा शहरामध्ये हा प्रकार घडला तेथील स्थानिक प्रशासनाने करोनामुळे या भागात केवळ सात मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. मात्र आपण या शवागारामध्ये अनेक मृतदेह पाहिल्याचा दावा या मॉडेलने केला आहे. आपण जे पाहतोय त्यावर या मॉडेलचा विश्वास बसत नव्हता त्यामुळेच तिने लगेच या शवागारातील एक व्हिडीओ स्वत:च्या फोनवर शूट केला. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या शवागराध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या छोट्याश्या शहरामध्ये करोनामुळे ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आता रशिया करोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांचा आकडा लपवत आहे का यासंदर्भातील चर्चा सुरु झाल्यात.

रशियामधील माजी ब्यूट क्वीनने एका शवागरामधील मृतदेहांचा व्हिडीओ काढला. या मॉडेलच्या वडिलांचा मृत्यू करोनामुळे झाल्याने ती या शवागरामध्ये गेली होती. त्यावेळी तिने हा व्हिडीओ काढला. देशाच्या  नैऋत्यला असणाऱ्या समारा शहरामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. ३७ वर्षीय ओल्गा कागार्लिट्स्काया या मॉडेलसोबत हा धक्कदायक प्रकार घडल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. आधीच वडिलांचा मृत्यू त्यात अशाप्रकारे अनेक मृतदेह एकाच वेळी पाहिल्याने तिला काय करावं कळलं नाही मात्र तिने शवागरातील परिस्थितीचे चित्रण केलं.

रशियामध्ये करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा हा सरकारकडून सांगण्यात येणाऱ्या अधिकृत आकड्यांपेक्षा तीन पटींनी अधिक असल्याचे सांगितले जात आहे. देशभरामध्ये यासंदर्भातील चर्चा सुरु असतानाच आता हा व्हिडीओ समोर आल्याने करोनासंदर्भातील आकडेवारी संदर्भात यंत्रणांनी स्पष्टीकरण द्यावेे अशी मागणी होत आहे. सोमवारी रशियाची राजधानी असणाऱ्या मॉस्कोमध्ये सहा हजार ३६० जणांना करोनाची लागण झाल्याने करोनाबाधितांचा आकडा २२ हजार ७७८ वर पोहचला. देशातील करोनाबाधितांचा आकडा हा १९ लाख ४८ हजार ६०३ पर्यंत गेला आहे.

सरकारी आकडेवारीमध्ये गडबड असल्याचा ठामपणे दावा करता येईल असा व्हिडीओ समोर आणणाऱ्या ओल्गाने आपले वडील गेनेडी कागार्लिट्स्काया हे रुग्णवाहिकेसाठी चालक म्हणून काम करायचे असं सांगितलं. याच कामादरम्यान त्यांना करोनाचा संसर्ग झाला. मीस समारा २००५ ची विजेती ठरलेली ओल्गा करोनामुळे मरण पावलेल्या आपल्या वडिलांचा मृतदेह घेण्यासाठी गेली असता तिला कर्मचाऱ्यांनी आडवले. मात्र करोनामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह ठेवण्याच्या ठिकाणी काळ्या पिशव्यांमध्ये अनेक मृतदेह असल्याचे ओल्गाला दिसले. “आमच्या इथे समारामध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची अधिकृत आकडेवारी सात आहे. मात्र इथे सातहून खूप जास्त मृतदेह दिसत आहेत. हे सर्व लोकं आपल्या कर्तव्याचे पालन करताना करोनाला बळी पडले आहेत,” असं ओल्गा या व्हिडीओत सांगताना दिसते.

आपण व्हिडीओ शूट केल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी आपल्याला करोनामुळे ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याचा दावा केला आहे. रशियन सरकारमधील माजी अधिकाऱ्यांनीही अशाचप्रकारचे आरोप लावल्यानंतर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सरकारकडून रोज मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे जे आकडे सांगितले जात आहेत ते पूर्णपणे खोटे असल्याचा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे.