रशियाची राजधानी असणाऱ्या मॉस्कोपासून १०० मैल दक्षिणेला असणाऱ्या तुला शहरामधील एका तरुण नर्सवर महिन्याभरापूर्वी नियम भंग केल्याप्रकरणी करावाई करण्यात आली होती. वयाच्या विशीत असणाऱ्या आणि करोनाग्रस्त पुरुषांच्या वॉर्डमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या नादिया जुकोवा नावाच्या या नर्सने पीपीई कीट घातल्यानंतर खूप उकडत असल्याचे कारण देत केवळ अंतर्वस्त्रं  (लाँजरी (Lingerie)) घालून रुग्णांवर उपचार केल्याची माहिती समोर आली होती. धक्कादायक बाब म्हणजे करोना वॉर्डमध्ये वापरण्यात आलेले पीपीई कीट हे पारदर्शक प्लॅस्टीकपासून बनवण्यात आले होते. त्यामुळेच या नर्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. यानंतर या नर्सवर रुग्णालय प्रशासनाने कारवाई केली असल्याचे वृत्त ‘मेल वन’ या वेबसाईटने दिले होते. मात्र आता नर्सला पुन्हा नोकरीवर घेण्यात आले असून तिला एक मोठी संधीही मिळल्याचे ‘द सन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने म्हटलं आहे.

काय घडलं होतं?

तुला येथील करोनाग्रस्तांसाठीच्या रुग्णालयामधील पुरुषांच्या वॉर्डमधील २३ वर्षीय नादियाचा फोटो एका रुग्णानेच सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केल्याचे सांगण्यात आलं. त्यानंतर पाहता पाहता हा फोटो व्हायरल झाला. याचीच दखल घेत रुग्णालय प्रशासनाने नादियाने कामावर असताना ड्रेस कोडचे पालन केले नाही असा आरोप ठेवत तिच्यावर कारवाई केल्याचे मेल वनने आपल्या वृत्तात म्हटलं होते. या नर्सच्या कृत्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तिने नर्सच्या ड्रेसवर पुन्हा पीपीई कीट घातल्यानंतर खूप गरम होतं कारण दिलं होतं. तसेच आपण घातलेले पीपीई कीट पारदर्शक असल्याची कल्पना नसल्याचेही तिने ‘तुला स्थानिक रुग्णालया’तील अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. मात्र चौकशीनंतर नादियाला दोषी ठरवून तिला नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं. नादियावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात देशभरातील डॉक्टर्स आणि नर्सने आवाज उठला होता.

फोटो सौजन्य: Mail Online

नोकरी परत मिळाल्यावर ती काय म्हणाली?

मला नेहमीच लोकांची सेवा करण्याची इच्छा असल्याने मी नर्सचा पेशा निवडला होता. नोकरी परत मिळाल्यानंतर कामावर येऊन खूप चांगलं वाटत ंआहे असंही नादियाने सांगितलं आहे. नादियावर कारवाई केल्याप्रकरणी आता रुग्णालयानेच लोकांची माफी मागितली असून यासंदर्भात एक औपचारिक पत्रही जारी करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार नादियाचे वडील हे रशियामधील गुप्तचर यंत्रणा असणाऱ्या एफएसबीसाठी काम करतात. स्वत:ला होणाऱ्या त्रासापेक्षा रुग्णसेवेला प्राधान्य देत पीपीई कीट खाली केवळ अंतर्वस्त्रं  घालून काम केलं होतं. तरी यासंदर्भात आजही माझ्याकडे विचारणा झाल्यास मला अवघडल्यासारखं होतं असं नादिया सांगते.

मॉडलिंगची संधी…

रशियामधील लोकप्रिय स्पोर्ट्सवेअर ब्रॅण्ड झास्पोर्ट्सने नादियाला आपल्या पुढील कॅम्पेनसाठी निवडलं आहे. या कंपनीची मालकीणही एफएसबीमधील अधिकाऱ्याची मुलगीच आहे. या महिलेने नादियासाठी एक ऑनलाइन मोहीम राबवली होती. एका फोटोमुळे एखाद्याचे आयुष्य पूर्णपणे कसे बदलू शकते याचा आता मला अंदाज येत आहे असं नादियाने म्हटलं आहे.

तो फोटो आणि पाठिंबा…

तो व्हायलर झालेला फोटो कोणी काढला होता आणि तो इंटरनेटवर कसा गेला हे अद्याप नादियालाही कळालेलं नाही. नादियाच्या सांगण्यानुसार हा प्रकार घडल्यानंतर सकाळी ती रुग्णालयात गेली तर अनेकांनी तिला हा व्हायरल फोटो आणि प्रासारमाध्यमांमध्ये छापून आलेल्या बातम्या दाखवल्या. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे अंगरक्षक राहिलेले आणि सध्या तुला प्रांताचे राज्यपाल असलेल्या अलेक्सी ड्यूमिन यांनाही नादियाला पाठिंबा दर्शवला होता.