करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी या काळात घरातच राहण्याचं आवाहन सरकारी यंत्रणा करत आहेत. या काळात आजी-माजी खेळाडू घरातच राहत आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. सध्याच्या परिस्थितीत अत्यावश्यक सेवा वगळचा सर्व गोष्टी बंद आहेत. मुंबईत बहुतांश भागात सलूनची दुकानं बंद असल्यामुळे अनेक मुंबईकरांसाठी केस आणि दाढी हा चर्चेचा मुद्दा बनलाय.

भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर या लॉकडाउन काळात हेअर स्टायलिस्ट झाला आहे. आपला मुलगा अर्जुनचे केस कापतानाचा एक व्हिडीओ सचिनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

करोनाविरुद्ध लढ्यात सचिन तेंडुलकर सुरुवातीपासून सक्रीय सहभागी आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यापासून ते अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या स्वच्छताविषयक उपक्रमात सचिन सहभागी झाला आहे. लोकांनी अधिकाधिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहनही सचिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून केलंय.