इजिप्तमधल्या अलेक्झॅड्रीयामध्ये राहणारी ३६ वर्षीय इमान ही जगातील सगळ्यात लठ्ठ महिला आहे. या महिलेचे वजन तब्बल ५०० किलो म्हणजे अर्धा टन असल्याचे नोंदवण्यात आले आहे. इमान ही गेल्या २५ वर्षांपासून घरातून बाहेरच पडली नाही. काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरने ट्विट करत स्वराज यांना तिची मदत करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देत स्वराज यांनी भारतात तिच्यावर उपचार करण्यत येईल असे सांगितले होते. आता मुंबईतील चर्नी रोड येथे असलेल्या सैफी रुग्णालयात तिच्यावर उपाचार करण्यात येणार असून त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्चून तिच्यासाठी वेगळा कक्ष उभारण्यात येत आहे.

जगातील सगळ्यात लठ्ठ महिला म्हणून अलेक्झॅड्रीयामध्ये इमान अहमद ओळखली जाते. गेल्या २५ वर्षांपासून ती घरातून बाहेरच पडली नाही. या महिलेचे वजन इतके अधिक आहे की तिला बिछान्यावरुन हलताही येत नाही. आपल्या दैनंदिन क्रियेसाठी ती पूर्णपणे आपल्या आई आणि बहिणीवर अवलंबून असते. इमानचे लहानपणापासूनच वजन हे तिच्या वयापेक्षा अधिक होते. जन्माच्यावेळीच तिचे वजन जवळपास ५ किलोच्या आसपास होते. इमान ही ११ वर्षांची झाली तेव्हा तिच्या वजनामुळे तिला नीट उभे राहता यायचे नाही. त्यामुळे खेळण्या बाडगण्याच्या वयात इमानला घरातच राहावे लागायचे. त्यातूनच अर्धांगवायूचा झटका आल्याने तिला शाळाही सोडावी लागली. गेल्या २५ वर्षांपासून तिची आई आणि बहिण तिची सेवा करत आहे. त्यामुळे तिच्यावर उपचार करता यावे यासाठी तिच्या आईने इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल सीसीकडेही साहाय्य मागितले होते. जेव्हा तिच्याबद्दल पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना समजले तेव्हा तिला मदत करण्याची पूर्ण तयारी त्यांनी दाखली.

viral video : बंदुकीतून सुटलेली गोळी तोंडात पकडण्याचा स्टंट जादुगाराच्या जीवावर बेतला

त्यानुसार तिच्यावर आता भारतात उपचार करण्यात येणार आहे. चर्नी रोड येथल्या सैफी रुग्णालयात तिच्यावर उपाचार करण्यात येणार आहे. यासाठी या रुग्णालयाच्या परिसरात तिच्यासाठी वन बेड हॉस्पिटल तयार करण्यात येत असल्याची माहिती ‘मुंबई मिरर’ने दिली आहे. यासाठी या रुग्णालय परिसरात बांधकामही सुरू झाले असून या महिन्याच्या शेवटपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची एक कुमकही तैनात असणार आहे. तिच्या शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळी उपकरणेही या छोट्या रुग्णालयात आणण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसाठी एकही पैसा या महिलेच्या कुटुंबियांना द्यावा लागणार नाही. यासाठी डॉक्टर मुफी लकडावाला यांनी निधी गोळा केला असल्याचे समजते. इमान अहमद कधी भारतात येणार हे मात्र समजले नाही. जर तिच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर नक्कीच तिला एक नवे आयुष्य मिळेल.

वाचा : कॅडबरीने काढला ९ कोटींचा ‘जीभ विमा’